‘मरे’च्या घोळामुळे चाकरमान्यांचे हाल
By admin | Published: May 23, 2015 01:33 AM2015-05-23T01:33:36+5:302015-05-23T01:33:36+5:30
ठाणे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये ठाणे-सीएसटी २५ या लोकलचा पेंटाग्राफ अडकल्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडित झाली.
डोंबिवली : ठाणे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये ठाणे-सीएसटी २५ या लोकलचा पेंटाग्राफ अडकल्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडित झाली. या घटनेमुळे रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे स्थानकातील फलाट क्र. १च्या अप मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे त्या फलाटासह डाऊन मार्गे येणारी २, अप वर जाणारी ३/४ या चारही वाहतूक खंडित झाली होती. तीन तास लोकल नसल्याने स्थानकात प्रवाशांची प्रचंड झुंबड उडाली होती.
या घटनेपाठोपाठ कळवा-ठाणे मार्गावरही ओएचईत समस्या उद्भवल्याने त्या ठिकाणच्या धीम्या मार्गावर दिवा-डोंबिवलीपर्यंत अप/डाऊनवर गाड्यांची रांग लागलेली होती. प्रवाशांचा ‘दिवा’ स्थानकाप्रमाणे उद्रेक होऊ नये, यासाठी दिवा स्थानकातून धीम्या मार्गावरील लोकल जलदवर वळवण्याचा निर्णय घेतला. त्या गाड्या विक्रोळी स्थानकानंतर पुन्हा धीम्यावर वळवल्या. त्याचप्रमाणे डाऊनच्या गाड्या विक्रोळी ते दिवा मार्गावर जलदने धावल्या.
या घटनेनंतर विभागीय व्यवस्थापक (डिआरएम) अमित ओझा यांच्यासह वरिष्ठ वाणिज्य रेल मंडल प्रबंधक अलोक बडगुल इत्यादींनी घटनास्थळी भेट दिली. त्या सर्वांना प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागला. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकांनी केली लूट? : प्रवाशांच्या गैरसोयीचा नेहमीप्रमाणे रिक्षाचालकांनी लाभ घेतला. एरवी कळवा ते ठाणे मार्गावर रिक्षा १५ रुपये आकारते. शुक्रवारच्या गोंधळात मात्र रिक्षाचालकांनी तब्बल ४५ ते ५० रुपये आकारत प्रवाशांची लूट केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी जितेंद्र विशे (सरचिटणीस-उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था) यांनी ‘लोकमत’ला दिली.
अखेरीस १२.३० ला
धावली पहिली लोकल :
सकाळी ९.५३ पासून ठप्प झालेल्या धीम्या अप मार्गावरून दु. १२.३०च्या सुमारास पहिली लोकल मंद गतीने धावली. त्या वेळी ओएचई समस्या सोडविण्यात यश आले. त्या चाचणीनंतर हळूहळू लोकल सोडण्यात आल्या. दुपारी दीडनंतर वाहतूक काहीशी सुरळीत झाली.
च्या घटनेमुळे अपच्या २ आणि डाऊनच्या १२ या धीम्या मार्गावरील १४ लोकल फेऱ्या रद्द झाल्या तर ६ लोकल अंशत: रद्द झाल्याची माहिती ‘मरे’च्या जनसंपर्क विभागाने दिली. स्थानकांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.