मुंबईमध्ये एक आठवड्यापासून कांद्याची आवक कमी होऊ लागली असून बाजारभाव जवळपास दुप्पट झाले आहेत. सप्टेंबरमध्ये रोज सरासरी २ हजार टन आवक होत होती. होलसेल मार्केटमध्ये ६ ते १२ रुपये दराने व किरकोळ मार्केटमध्ये १० ते १५ रुपये दराने कांदा विकला जात होता; परंतु सद्य:स्थितीमध्ये आवक १६०० ते १७०० टनावर आली आहे.
होलसेल मार्केटमध्ये कांदा दर १८ ते २४ रुपये झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये २५ ते २८ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. उन्हाळी कांद्याची आवक कमी होत असून, यावर्षी पाऊस व्यवस्थित झाला नसल्यामुळे खरिपाचे पीक वेळेत येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाववाढ सुरू झाली आहे. पुढील महिन्यात बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवाळी जवळ आली असताना कांद्याचे भाव वाढल्यामुळे गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.