लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तांत्रिक अडचण आणि त्यामुळे करण्यात आलेल्या सहा ते सात तासांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी अखेर कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला मुंबईत सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना तर ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस देण्यात आली. सोमवारी मुंबईत पालिकेच्या पाच आणि तीन खासगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती.
या लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत होता. लस मिळणार म्हणून मुंबईतील या सर्व लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनी ९ वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र नोंदणी ॲपमध्ये तांत्रिक अडचण आल्याने या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कित्येक तास रांगेतच थांबावे लागले. अनेक तास उलटूनही लसीकरणाला सुरुवात न झाल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी घरची वाट धरली. तर काही नागरिक आज लस घेऊनच घरी जायचे या उद्देशाने थांबले. रुग्णालय प्रशासनाकडूनदेखील त्यांची समजूत काढून त्यांना धीर देण्यात येत होता. अखेर दुपारी साडेतीन वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. सर्व रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे लसीकरण पार पडले. लसीकरण सुरळीत पार पडावे, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले नव्हते हे यावरून स्पष्ट झाले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचेही हाल झाले. काहींनी घरी जाण्याचा पर्याय निवडला. तर काही ज्येष्ठ नागरिकांनी केंद्रावर थांबून लस टोचून घेतली.
केंद्रांवर नोंदणीचा गोधळ उडाल्याने गर्दी न करण्याच्या नियमाचा चांगलाच फज्जा उडाला. यापुढे तरी लसीकरणासाठी नियोजन केले जाईल, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. सरकार ही मागणी पूर्ण करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम उपनगरात लसीकरण मोहिमेला मिळाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादnअंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि गोरेगाव पूर्व येथील नेस्को कॅविड सेंटरमधील लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.nसुरुवातीला देशात कोविन ॲपमध्येच बिघाड झाल्याने मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि गोरेगाव पूर्व येथील नेस्को कॅविड सेंटरमध्ये दुपारी १२.३० वाजता लसीकरण मोहिमेला सुरळीत सुरुवात झाली.मात्र नंतर या दोन्हीकडे लसीकरणाला वेग आला.nया ठिकाणी लस घेण्यासाठी सकाळी ९ पासून नागरिकांनी गर्दी केली होती. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६६६ नागरिकांनी लस घेतली यामध्ये ४५० ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता, अशी माहिती येथील अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.n नेस्को कोविड सेंटर लसीकरणाला दुपारी १२.३० वाजता सुरुवात झाली. आमचे आजचे टार्गेट ४०० लसीकरणाचे होते, मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५१७ नागरिकांनी लस घेतली. यामध्ये २३६ ज्येष्ठ नागरिक आणि डॉक्टरांनी व्याधीग्रस्त म्हणून सर्टिफिकेट दिलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील ६८ नागरिकांचा समावेश होता अशी माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी लोकमतला दिली.n लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. त्याचा काहीसा दिलासा मिळाला.