Join us

घोडांच्या निधनामुळे जिल्हा बँकेत सत्तांतर ?

By admin | Published: May 24, 2015 11:13 PM

पालघरचे आमदार आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष कृष्णा घोडा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी पहाटे निधन

ठाणे : पालघरचे आमदार आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष कृष्णा घोडा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी पहाटे निधन झाल्यामुळे जिल्हा बँकेतील संचालकांचे संख्याबळ समसमान झाले असून वसई विकासने जोर लावला तर विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळ अल्पमतात येऊन बँकेत सत्तांतर घडू शकते. तसेच अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या कास्टिंग व्होटवर म्हणजेचे निर्णायक मतावर आता विद्यमान संचालक मंडळाची सत्ता अवलंबून राहणार आहे. तर घोडा यांच्या जागी डहाणू सेवा संस्थेतून पुन्हा नव्या स्वीकृत संचालकांची निवड संचालक मंडळामार्फत होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार आणि लोकशाही सहकार या दोन पॅनलच्या अटीतटीच्या लढतीमध्ये घोडा हे सहकार पॅनलमध्ये अखेरच्या क्षणी दाखल झाले होते. प्रत्येक नव्या वर्षी नव्या संचालकांना अध्यक्ष, उपाध्यक्ष पद देण्याचे निश्चित झालेले होते. त्यात पहिल्याच वर्षी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना अध्यक्षपद तर उपाध्यक्षपद कृष्णा घोडा यांना २१ मे रोजी मिळाले होते. लोकशाही सहकारच्या जगन्नाथ चौधरींचा एका मताच्या फरकाने घोडा यांनी पराभव केला होता व पदाची सूत्रेही स्वीकारली होती. बँकेवर प्रथमच डहाणू सेवा सहकारी संस्थामधून बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेल्या घोडांना पहिल्याच वर्षी उपाध्यक्षपदही मिळाले. परंतु, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते औटघटकेचे व बँकेची सत्ता समीकरणे बदलणारे ठरले.