विकासाच्या मुद्द्यानेच डाव्यांचा पाडाव- सुनील देवधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:35 AM2018-03-14T06:35:46+5:302018-03-14T06:35:46+5:30
त्रिपुरात भारतीय जनता पार्टीचा विजय सुरुवातीला अशक्य वाटत होता. मात्र विकासाच्या मुद्द्यावर त्याठिकाणी परिवर्तन करण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन त्रिपुरातील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी मंगळवारी केले.
मुंबई : त्रिपुरात भारतीय जनता पार्टीचा विजय सुरुवातीला अशक्य वाटत होता. मात्र विकासाच्या मुद्द्यावर त्याठिकाणी परिवर्तन करण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन त्रिपुरातील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी मंगळवारी केले. मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
देवधर म्हणाले] सत्ता जाण्याची चिन्हे दिसू लागताच भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. धक्कादायक म्हणजे त्रिपुरात बलात्कारासारख्या संवेदनशील मुद्द्याचा वापर राजकीय चिखलफेक करण्यासाठी केला गेला. मात्र सर्वसामान्य नागरिक डाव्यांच्या राजवटीला कंटाळले होते. म्हणूनच कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळे सत्तापरिवर्तन शक्य झाले. जनतेला विकास हवा होता. त्रिपुरात पर्यटन क्षेत्राच्या विकासाची मोठी संधी आहे. पर्यटनातून मोठ्या संख्येने रोजगार निर्मित होऊ शकते. याशिवाय फळ प्रक्रिया केंद्रांच्या माध्यमातून अनेक उद्योगांना आमंत्रण देता येईल. त्यामुळे केंद्राच्या मदतीने लवकरच त्रिपुरा राज्य विकासाच्या शिखरावर दिसेल, असेही ते म्हणाले.
तळागाळात संपर्क असलेल्या डाव्यांचा पराभव करण्यासाठी भाजपानेही तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची फौज उभी केली. काँग्रेसची केंद्रातील डाव्यांसोबतची मैत्री पाहून जनतेला भाजपा हाच प्रभावी पर्याय म्हणून आम्ही समोर आणला.
भाजपा सत्तेवर आल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी करून शिक्षेच्या प्रमाणात वाढ होईल, असे सांगताना देवधर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित सुधारण्याचे आश्वासित केले.
>कम्युनिस्टांची देशभक्तीच्या विचारधारेत अडचण
भाजपाची विचारधारा देशभक्तीची आहे. याउलट कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा देशभक्तीच्या विचारधारेला अडचण आहे. त्यामुळे ती संपवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याजागी राष्ट्रवाद तयार करण्याची गरज असून आपल्या विचारधारेत अडचण ठरणाºया विचारधारांना हद्दपार करण्याचा इशाराही देवधर यांनी दिला.