विकासकामांमुळे कोंडीची घुसमट कायम
By admin | Published: December 29, 2016 02:39 AM2016-12-29T02:39:17+5:302016-12-29T02:39:17+5:30
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महापालिकेकडून सुरू असणाऱ्या विविध विकासकामे सुरू आहेत. पण या कामांमुळे मुंबईकरांची
टीम लोकमत, मुंबई
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महापालिकेकडून सुरू असणाऱ्या विविध विकासकामे सुरू आहेत. पण या कामांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीमुळे होणारी घुसमट कायम आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून ठिकठिकाणी भूमिगत जलवाहिन्यांच्या कामांसह रस्त्यांच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा समावेश आहे. दादर येथील केळकर मार्ग, माहीम येथील एस.व्ही. रोड अशा अनेक रस्त्यांची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. मात्र रस्त्यांच्या खोदकामांमुळे ठिकठिकाणी रस्ते अरूंद झाले असून, रस्त्यांच्या कामांसाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे समस्यांत भरच पडली आहे.
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातही रस्त्यांच्या खोदकामांमुळे कोंडीची अशीच अवस्था असून, ऐन पीक अवरला होत असलेल्या कोंडीमुळे चालकांना १५ मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास खर्ची घालावा लागत आहे. सद्य:स्थितीत दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाच्या कामांमुळे रस्ते अरूंद होण्यासह कोंडीत भर पडत आहे. याच वाहतूककोंडीला वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने वाहतूककोंडीचा सविस्तर आढावा घेतला आहे.
सागर हॉटेल ते पॅरेडाईज सिनेमापर्यंतचा मार्ग, माहीम
माहीम येथे सागर हॉटेल ते पॅरेडाईज सिनेमापर्यंतच्या मार्गावरील फुटपाथवर तीन ठिकाणी मेट्रो-३चे काम सुरू करण्यात आले आहे. येथे कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, काही बॅरिकेड्स रस्त्यालगतही लावण्यात आले आहेत. परिणामी, रस्ता काहीसा अरूंद झाला आहे. अरूंद रस्त्यामुळे वाहनांची कोंडी होत असून, या कोंडीमुळे पाच मिनिटांच्या प्रवासाला दहा मिनिटे खर्ची होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दादर
दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एसटी थांब्यालगतही रस्ता खोदण्यात आला आहे. येथील रस्ता अरूंद झाला आहे. सकाळी आणि सायंकाळी झालेल्या वाहतूककोंडीमुळे खोदादाद सर्कलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. कोंडीत वाहनचालकांची किमान १५ ते २० मिनिटे खर्ची पडतात. परिणामी, पुढील प्रवासाला विलंब होतो. विशेषत: एशियाड आणि एसटीचा थांबा आहे. बाहेरगावी जात असलेल्या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते.
वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगतच्या वीर सावरकर मार्गावरील भूमिगत जलवाहिनीचे
काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महापालिकेने हा रस्ता खोदला आहे.
परिणामी, अरूंद झालेल्या रस्त्यासह वाहनांची भर पडत असल्याने कोंडीत वाढच होत आहे. या कारणात्सव प्रभादेवीकडून शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या वाहनचालकांना येथील अंतर कापण्यास पाच मिनिटांऐवजी दहा मिनिटे खर्ची घालावी लागत आहेत.
खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणी सिग्नल आहे. येथे आगर बाजाराकडे जाण्यासाठी वाहनांना उजवे वळण
घ्यावे लागते. हे वळण घेताना
वाहनांची कोंडी होत असून, उर्वरित वाहनचालकांना मनस्ताप सहन
करावा लागतो.
पोर्तुगीज चर्च, दादर
दादर येथील पोर्तुगीज चर्चसमोरील रस्त्याचे महापालिकेकडून डांबरीकरण सुरू आहे. प्रीती- एम.ई. (जे.व्ही.) या ठेकेदाराने हे काम हाती घेतले आहे. ७ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र या रस्त्याच्या कामामुळे येथील कोंडीत वाढ होत असून, वाहनचालकांना येथील १० मिनिटांच्या प्रवासाला २० मिनिटे खर्ची घालावी लागत आहेत.
एमटीएनएल, दादर
दादरमधील महानगर टेलिफोन निगम संचार मार्गाचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे नागरिक त्रस्त असून, येथील वाढत्या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
वरळी आणि महालक्ष्मी
वरळी येथून महालक्ष्मी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरही मेट्रो-३चे काम हाती घेण्यात आले आहे. अरूंद झालेल्या रस्त्यामुळे वाहनांची कोंडी होत असून, सकाळसह सायंकाळाच्या कोंडीमुळे प्रवास अधिकच लांबत आहे. महत्त्वाचे म्हणजे १५ मिनिटांच्या प्रवासासाठी किमान २५ ते ३० मिनिटे वाहनचालकांना खर्ची घालावी लागत आहेत.
केळकर मार्ग, दादर
महापालिकेच्या वतीने दादर पश्चिमेकडील केळकर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग शिवसेना भवनापासून हनुमान मंदिरापर्यंत आहे. या कामाचे कंत्राट आर.के. मधानी अॅण्ड लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे.
रस्त्याचे काम ८ मार्च २०१६ रोजी
सुरू झाले असून, हे काम पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिन्यांचा आहे. या कामाकरिता रस्ता ठिकठिकाणी खोदण्यात आला
आहे. परिणामी, हा रस्ता आणखी अरूंद झाला आहे. मार्गावरील दोन्ही दिशांकडील वाहतूक सुरू असली
तरी वाहनांच्या गर्दीमुळे येथील
कोंडीत भर पडत आहे. सकाळी आणि सायंकाळी येथील वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात असले तरी पीक
अवरला झालेली वाहनांचीकोंडी फोडणे त्यांनाही कठीण जाते आहे. एऱ्हवी हे अंतर पार करण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. मात्र कोंडीत भरच पडत असल्याने सध्या या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना वीसएक मिनिटांहून अधिक वेळ खर्ची घालावा लागत आहे.