डॉलरच्या बहाण्याने फसवणारा अटकेत
By admin | Published: June 26, 2015 01:42 AM2015-06-26T01:42:06+5:302015-06-26T01:42:06+5:30
स्वस्तात परदेशी डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ८१ डॉलर किमतीच्या खऱ्या नोटा
नवी मुंबई : स्वस्तात परदेशी डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ८१ डॉलर किमतीच्या खऱ्या नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
स्वस्तात परदेशी डॉलर देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना शहरात घडत आहेत. अशा गुन्ह्णांमध्ये सक्रिय असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तपासाला सुरवात केली. त्यानुसार मुंब्रा येथून एकाला अटक करण्यात आली आहे. कबीर शेख (२४) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २० डॉलर किमतीच्या ४ व १ डॉलर किमतीची एक अशा ८१ डॉलर किमतीचे चलन जप्त करण्यात आले आहे.
एखाद्याची फसवणूक करण्यापूर्वी विश्वास मिळवण्यासाठी या खऱ्या डॉलरचा वापर केला जायचा. अशाप्रकारे त्यांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी गुन्हे केलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला स्वस्तात डॉलर देतो असे सांगून, त्याला खरे डॉलर दाखवायचे. त्यानंतर व्यवहाराची रक्कम व जागा निश्चित होताच समोरच्याकडून पैसे घेतल्यानंतर त्याच्या हातात कागदाचे बंडल टेकवून तो पळ काढायचा असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. खबऱ्याद्वारे शेखची माहिती मिळताच शिंदे यांच्या पथकाने बुधवारी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला चार दिवसांची कोठडी मिळाली असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यताही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)