दुष्काळामुळे लोंढे शहराकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:51 AM2018-10-04T05:51:25+5:302018-10-04T05:51:58+5:30
नाका कामगार म्हणून उपजीविका : गावात रोजगार नसल्यामुळे शहराकडे धाव
योगेश पिंगळे
नवी मुंबई : विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी मुंबई, नवी मुंबईकडे धाव घेतली आहे. जिथे जागा मिळेल तेथे राहून नाका कामगार म्हणून हे मजूर उपजीविका भागवू लागले आहेत.
नेरु ळ, सानपाडा, कोपरखैराणे, तुर्भे आदी भागात वाशिम, नांदेड, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील लहान-मोठ्या खेड्यामधील शेकडो शेतकरी मजूर आपल्या कुटुंबासोबत गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत आहेत. मजुरीची कामे मिळावीत यासाठी नेरु ळ जनता मार्केट, तुर्भे नाका येथे सकाळीच कामाच्या शोधात जात आहेत.
दिवसभराच्या कामाचा मोबदला पुरु षांना ४00 तर स्त्रियांना ३00 रु पये मिळतो; परंतु रोज काम मिळेल याची मात्र शाश्वती नाही. स्त्री मजूर वर्गाला वाशी येथील एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा निवडीचे काम मिळत आहे. त्यामुळे महिला कामगारांना देखील रोजगार प्राप्त झाला आहे. यामधील बऱ्याच शेतकरी मजुरांनी आपली शाळेत जाणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी घरी असलेले वृद्ध आई-वडील किंवा नातेवाईक यांच्याकडे ठेवले आहे.
विदर्भ व मराठवाडा परिसरातील शेतमजूर प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर मुंबईकडे येत असतात; परंतु यावर्षी अनेक भागात शेतामध्ये मजुरी मिळत नसल्यामुळे लवकरच मुंबईत आले आहेत. डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी तर काही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी शहराकडे येत आहेत. रोजंदारीवर मिळणाºया पैशातील गुजराण करणाºया शेतकरी व शेतमजुरांना शहरातही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरातही अडचणींचा डोंगर
मुंबई, नवी मुंबईत आलेले शेतमजूर महापालिकांच्या अतिक्र मण विभागाकडून कारवाई होऊ नये यासाठी झोपड्या न बांधता उड्डाणपुलाखाली, पदपथ, मोकळे भूखंड अशा मिळेल त्या जागेवर उघड्यावरच राहत आहेत. काही ठिकाणी हे नागरिक मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधून राहत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तात्पुरता दिलासा मिळत असून, शहराबाहेरून आलेल्या आणि उघड्यावर वास्तव्य करणाºया नागरिकांमुळे शहरात कोणक़जतेही आजार पसरू नयेत, तसेच या नागरिकांचे आरोग्य देखील निरोगी राहावे यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उघड्यावर वास्तव्य करणारे नागरिक असल्याचे समजल्यास लहान मुले व गरोदर माता यांना लसीकरण करत आहेत.
पाऊस कमी झाल्याने खेड्याकडे मजुरीची कामे मिळत नाही. पोट भरण्यासाठी आम्ही शहरात आलो आहोत. लहान मुले शाळेत शिकत असल्याने मुलांना घरातील वृद्ध व्यक्तींकडे ठेवले आहे. शाळेत न जाणारी मुले सोबत आणली आहेत. त्यांचा सांभाळ करताना कसरत करावी लागत आहे.
- किसन गोरे, वाशिम