Join us

एसटी महामंडळाला दुष्काळाचा फटका

By admin | Published: August 19, 2015 1:21 AM

एसटी महामंडळाला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यात आता दुष्काळामुळे भरच पडली आहे. दुष्काळामुळे महामंडळाला मोठा फटका

मुंबई : एसटी महामंडळाला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यात आता दुष्काळामुळे भरच पडली आहे. दुष्काळामुळे महामंडळाला मोठा फटका बसला असून, मुंबई, ठाणे विभाग ते मराठवाडादरम्यानच्या १८ एसटी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. टोल, प्रवासी कर, शासनाकडून सवलतीचे न मिळालेले मूल्य यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच प्रवासी संख्याही वर्षभरात ११ कोटींनी कमी झाल्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. २0१४-१५मध्ये १ हजार ८६८ कोटी रुपयांचा संचित तोटा महामंडळाला सोसावा लागला. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी महामंडळ नवीन योजना तसेच सेवा सुरू करीत आहे, पण एसटी आर्थिक दुष्काळात असताना राज्यातील दुष्काळ दुष्काळातला तेरावा महिना होऊन आला आहे. या दुष्काळामुळे भारमानही कोलमडल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाचे भारमान हे ६२ टक्के एवढे हवे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हेच भारमान आता ५८ टक्क्यांपर्यंत आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागातून मराठवाडादरम्यान धावणाऱ्या तब्बल १८ सेवा प्रवासी नसल्याने नुकत्याच बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जण खर्चाला कात्री लावतात आणि या वेळी जवळचाच काय तर लांबचाही प्रवास करणे टाळतात. त्यामुळेच एसटी महामंडळाच्या सेवांवर त्याचा परिणाम होतो. मात्र या वेळी फेऱ्याच बंद कराव्या लागल्याने उत्पन्नावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.