मुंबई : पवई परिसरातील बांगुर्डा गावालगतच्या बांगुर्डा तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय बोट (१८) आणि चैतन्य रंगनाथ धिरंगे (३१) अशी दोघांची नावे आहेत. अजय अंधेरी येथे तर चैतन्य घाटकोपर येथे राहत होता.अंधेरी येथे वास्तव्यास असलेला अजय चार मित्रांसोबत बुधवारी साडेचारच्या सुमारास येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्या वेळी बुडालेला अजय यास त्याच्या मित्रांनीच बाहेर काढले. त्याला नजीकच्या होली स्पिरीट रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद मुलुंड पोलीस ठाण्यात झाली.
दुसऱ्या दुर्घटनेत बांगुर्डा तलावात मित्रांसोबत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या घाटकोपरच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. चैतन्य धिरंगे (३१) असे त्याचे नाव आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. चैतन्यचा शोध सुरू करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह आढळला. त्याला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलुंड पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली.महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करामुंबई : महापालिकेचा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच गोरेगाव पूर्व येथील गटारामध्ये पडून चिमुरड्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसह थेट पालिकेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली. शिवाय, या घटनेसाठी पालक, मुंबईकरांना जबाबदार धरण्याच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.दीड वर्षाचा मुलगा गटारात पडून वाहून जातो, तरीही महापालिकेवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. उलट महापौर नागरिकांवरच त्याची जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. हा सारा प्रकार संतापजनक असल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केली. प्राध्यापक असणाºया व्यक्तीकडून इतक्या असंवेदनशील वक्तव्याची अपेक्षा नव्हती. पावसाळ्यापूर्वी पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचे दावे पालिकेकडून केले जातात. हे सारे दावे या दुर्दैवी घटनेने फोल ठरले आहेत. यापूर्वी सुप्रसिद्ध डॉक्टर अमरापूरकर यांचाही मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही पालिका प्रशासन ढिम्मच राहते. महापालिकेला जनतेशी कसलेच सोयरसुतक राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.बुधवारी रात्री आंबेडकरनगर येथे दिव्यांश सुरज धाणसी हा दीड वर्षांचा मुलगा गटारात पडला. अद्याप त्याचा शोध घेता आला नाही. दुसरा दिवस उजाडेपर्यंत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना घटनेची माहितीही नव्हती. हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी केली.तर, या प्रकरणी संबंधितावर ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. यापूर्वीही गटारात पडून अनेकांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस या घटना वाढत आहेत. याची जबाबदारी सरकारने निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.