आर्थिककोंडी केल्यानेच अकराकरण बंधू आले शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:44 AM2019-12-17T05:44:15+5:302019-12-17T05:44:29+5:30
गुडविन घोटाळा : ब्रिटन, दुबईतील बांधकाम व्यवसायात होता रस
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सर्व बाजूंनी आर्थिक नाकाबंदी केल्यानेच ‘गुडविन ज्वेलर्स’च्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही बंधूंनी ठाणे न्यायालयात शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात, प्रत्येक वेळी वेगवेगळी विधाने करून ते पोलिसांची दिशाभूल करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
गेले वर्षभर गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन अकराकरण बंधू हे फसवणूक करीत होते. गेल्या सात ते आठ महिन्यांत त्यांच्या व्यवहारांमध्ये अनेक अनियमितता सुरूझाल्या होत्या. पण, तरीही कोणालाही शंका येणार नाही, अशा तºहेने अत्यंत नियोजनबद्धपणे त्यांनी २२ आॅक्टोबर २०१९ रोजी ठाण्यातून आपला गाशा गुंडाळून पलायन केले. त्यांच्या पलायनाची कुणकुण लागताच २६ आॅक्टोबर रोजी आधी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात, त्यापाठोपाठ ठाण्याच्या नौपाडा आणि नंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे प्रकरण २८ आॅक्टोबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके ३० आॅक्टोबर रोजी केरळमध्ये रवाना झाली. संपूर्ण महिनाभर तिन्ही पथकांनी अकराकरण बंधूंच्या मालमत्तेचा शोध घेऊन ती जप्त केली. त्यांची केरळमधील नऊ वेगवेगळ्या बँकांमधील खातीही गोठविली. त्यापाठोपाठ लगेचच देशभरातील सर्वच विमानतळांवर लूक आउट नोटीसही जारी केली. महसूल विभागाच्या मदतीने केरळ, हैदराबादमधील २१ तसेच ठाणे, डोंबिवलीतील सहा अशा २७ मालमत्तांवर टाच आणली. आरोपींच्या उत्पन्नाच्या साधनांबरोबरच सर्वच बाजूंनी आर्थिककोंडी केल्यानेच त्यांच्यापुढे शरणागतीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच ते ६ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयात शरण आल्याचे या अधिकाºयाने सांगितले.
मल्याळी भाषिक एजंट्सची नियुक्ती
या आरोपींनी मल्याळी भाषिक अनेक पूर्णवेळ एजंटची नियुक्ती केली होती. दागिन्यांच्या व्यवसायातून ते बांधकाम व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करणार होते. तसेच ब्रिटन, कुवेत आणि दुबईमध्ये ते आपल्या बांधकाम व्यवसायातून पाय रोवण्याच्या तयारीत होते. त्याआधीच त्यांची ठाणे पोलिसांनी कोंडी केल्याने ते शरण आले.
तपासातही करतात दिशाभूल
चांगल्या प्रकारे गुंतवणूकदार असताना लोकांची फसवणूक कोणत्या कारणामुळे केली, असा सवाल केल्यानंतर कौटुंबिक कलहातून हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अकराकरण बंधू तपास अधिकाऱ्यांना सांगतात. तर, कधी वेगळेच उत्तर त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे तपासातही ते दिशाभूल करीत असल्याचे एका पोलीस अधिकाºयाने सांगितले.