निवडणुकांमुळे पोलिसांसमोर आव्हान दुपटीने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 02:34 AM2018-12-30T02:34:02+5:302018-12-30T02:34:11+5:30
येणारे २०१९ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आव्हाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत.
मुंबई : येणारे २०१९ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने पोलिसांसमोरील आव्हाने ही विशेष प्रकारची राहणार आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या वेळेला होणार असल्याने ही आव्हाने दुपटीने वाढणार असल्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय पक्ष प्रचारामध्ये कार्यरत असताना देशविघातक शक्ती राजकीय नेत्यांवर प्राणघातक हल्ले करून देशात अराजक माजविण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारात पैसे तसेच ताकदीचा गैरवापर करून विरोधी गटांना, व्यक्तींना तसेच वंचित, शोषित व्यक्तींना मतदानापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा प्रचार चालू असताना समाजमाध्यमे व अन्य माध्यमे यांचा वापर करून खोट्या बातम्या किंवा पैसे देऊन छापून आणलेल्या बातम्या यांचा वापर करून समाजामध्ये धर्माच्या नावाखाली, भाषेचा उपयोग करून, जाती-जातीत द्वेष निर्माण करून लोकांमध्ये प्रक्षोभ निर्माण करणे व त्यातून योग्यप्रकारे मतदान करण्यापासून लोकांना परावृत्त करणे यासाठी देशविघातक शक्ती उचल खाण्याची शक्यता आहे. यात देशाबाहेरील शक्तींचाही हात नाकारता येत नाही.
या अनुषंगाने दहशतवादाचे सतत होणारे प्रयत्न, शहरी माओवाद या नावाखाली पोलिसांवरील हल्ले हेही तीव्र होण्याची शक्यता आहे. इंटरनेटचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसे इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद, सायबर गुन्हे, महिलांची फसवणूक, आर्थिक गुन्हे, फसवाफसवी, मुलांवरील लैंगिक हल्ले यात वाढ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण नगण्य असल्याने हे गुन्हे करणारे गुन्हेगार अशाच प्रकारचे गुन्हे पुन्हा पुन्हा करण्यास मोकळे आहेत हे विसरून चालणार नाही. एकंदरीतच प्रचलित पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्यातसुद्धा पन्नास टक्क्यांहून अधिक गुन्हे सिद्ध न होण्यामुळे पोलिसांची प्रचंड ताकद व्यर्थ जात असते. गुन्हा नोंद करण्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे प्रशिक्षण व त्याचा परिणामकारक वापर हे पोलीस प्रशासनासमोरील फार मोठे आव्हान आहे.
कायद्याचे आपणहून पालन करण्याची प्रवृत्ती जनतेतील सर्व स्तरांमध्ये वाढविण्यासाठी सर्व लोकांची, त्यासाठी आवश्यक संशोधन करणाºया संस्था, निधी उपलब्ध करून देणारे देणगीदार यांची मदत व लोकप्रशिक्षण करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मन:पूर्वक ही जबाबदारी ओळखून जास्तीत जास्त लोकांचा या कामात पाठिंबा मिळवल्यास हे आव्हान ते पेलू शकतील. लोकांचा विश्वास टिकवायचा असल्यास नवनवीन तंत्रज्ञान, पारदर्शी व्यवहार, खंबीर नेतृत्व व भ्रष्टाचारमुक्त व्यवहार ही पोलिसांपुढील खरी आव्हाने आहेत. पोलीस हे करण्यास तयार आहेत का हे २०१९ मध्ये स्पष्ट होणार आहे, असेही दीक्षित यांनी नमूद केले.
पोलिसांवरील हल्ले तीव्र होण्याची शक्यता
दहशतवादाचे सतत होणारे प्रयत्न, शहरी माओवाद या नावाखाली पोलिसांवरील हल्ले हेही तीव्र होण्याची शक्यता आहे. इंटरनेटचा वापर जसजसा वाढत चालला आहे तसतसे इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद, सायबर गुन्हे, महिलांची फसवणूक, आर्थिक गुन्हे, फसवाफसवी, मुलांवरील लैंगिक हल्ले यात वाढ होण्याची शक्यता आहे.