मुंबई - मुखपत्र सामनामधून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सातत्याने टीकेचे आसूड ओढणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सरकारला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये सध्या असलेला तणाव पाहता कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. तेलाच्या किमती शंभरीही गाठू शकतील आणि महागाईत तेल ओततील. ही जागतिक कोंडी आपल्याला सोडविता येणे शक्य नाही, पण निदान देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी केंद्रातील सरकारने घेतली पाहिजे असे उद्धव यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात प्रामुख्याने पेट्रोलच्या दरात दररोज होणारी २० ते ४० पैशांची वाढ ही याच धोक्याची सूचना आहे. सरकारने हा धोका आताच ओळखायला हवा आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत वेळप्रसंगी हस्तक्षेप करण्याची तयारी ठेवायला हवी. किमान २०१८ आणि २०१९ ही निवडणुकीची वर्षे असल्याने तरी इंधन दरवाढीची सामान्यांना झळ बसणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात - पेट्रोल-डिझेल आणि दरवाढ या आपल्या देशात एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. मध्यंतरी दोन रुपयांच्या करकपातीचा ‘दिलासा’ सरकारने जनतेला दिला होता. मात्र नवीन वर्षात आधीच महाग असलेले पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरी गाठतील अशी जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती खरी ठरण्याची चिन्हे आहेत. सोमवारी दिल्लीमध्ये डिझेलचा दर प्रति लिटर ६१.७४ रुपये तर पेट्रोलचा दर ७१ रुपयांपर्यंत पोहोचला. ऑगस्ट २०१४ नंतर हे दर प्रथमच एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीच्या तुलनेत मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेल पूर्वीपासूनच महाग मिळते. साहजिकच, मुंबईमध्येही डिझेल प्रति लिटर ६५.७४ रुपये एवढे महागले आहे. म्हणजेच महिनाभरात डिझेलचे दर प्रति लिटर तीन-साडेतीन रुपये तर पेट्रोलचे दर दोन-अडीच रुपये एवढे वाढले आहेत. पुन्हा मध्यपूर्वेतील देशांमध्ये सध्या असलेला तणाव पाहता कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. ही वाढ तब्बल ३० टक्के एवढी मोठी असू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे. तसे झालेच तर आपल्या देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील. या किमती शंभरीही गाठू शकतील आणि महागाईत तेल ओततील. ही जागतिक कोंडी आपल्याला सोडविता येणे शक्य नाही, पण निदान देशांतर्गत परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी केंद्रातील सरकार घेऊ शकते. नव्हे ती घ्यावीच लागेल. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फास दिवसेंदिवस वाढतच जाणार आणि त्यामुळे हिंदुस्थानसह अनेक देशांचा श्वास कोंडणार हे उघड आहे. मागील आठवड्यात प्रामुख्याने पेट्रोलच्या दरात दररोज होणारी २० ते ४० पैशांची वाढ ही याच धोक्याची सूचना आहे. सरकारने हा धोका आताच ओळखायला हवा आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत वेळप्रसंगी हस्तक्षेप करण्याची तयारी ठेवायला हवी. किमान २०१८ आणि २०१९ ही निवडणुकीची वर्षे असल्याने तरी इंधन दरवाढीची सामान्यांना झळ बसणार नाही याची काळजी सरकारला घ्यावीच लागेल!