Join us

तीव्र उष्णतेमुळे सरपटणारे प्राणी घेत आहेत मानवी वस्तींत आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:09 AM

ओमकार गावंडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत उष्णता कमालीची वाढल्यामुळे आता थंडाव्याच्या शोधात साप मानवी वस्तीत प्रवेश करू ...

ओमकार गावंड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत उष्णता कमालीची वाढल्यामुळे आता थंडाव्याच्या शोधात साप मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. ते मानवी वस्तीत शिरून घरांमधील अडगळीच्या जागेत किंवा इमारतीच्या पार्किंगमधील एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसत आहेत. यामुळे शहरातील सर्प मित्रांनाही सापांची सुटका करण्यासाठी सतत फोन येत आहेत. मंगळवारी भांडूप येथील महानगरपालिकेच्या कार्यालयात नाग आढळून आला होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्पमित्रांना बाेलाले. यावेळी सर्पमित्र हसमुख वळंजू यांनी त्या नागाला जीवनदान दिले व निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

काही दिवसांपूर्वी दहिसर आणि पवई परिसरातूनही २ सापांना जीवनदान देण्यात आले होते. दहिसर येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये अजगर आढळून आला होता, तर पवई येथे एका घरामध्ये साप आढळून आला होता. मुंबईतील गोरेगाव, दहिसर, बोरिवली, मुलुंड, व भांडूप, अशा आसपास जास्त जंगल असणाऱ्या परिसरांमध्ये सापांचा वावर अधिक आढळून येत आहे.

मारू नका, जीवनदान द्या

वाढत्या उष्णतेमुळे आता साप मानवी वस्तीत आसरा शोधू लागले आहेत. अनेकदा साप मानवी वस्तींमध्ये उंदरांच्या शोधात जातात; परंतु या दिवसांमध्ये तापमान प्रचंड असल्यामुळे त्यांना थंडव्याची गरज भासते. अशा वेळेस माणसांनीही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मानवी वस्तीत साप शिरल्यावर अनेकदा त्याला मारण्यात येते. मात्र, असे न करता जवळच्या सर्पमित्रांना बोलावून त्या सापाला वाचविणे, जीवनदान देणे गरजेचे आहे. सापाला मारून हाती काहीच लागत नाही. याउलट आपण त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

-हसमुख वळंजू, सर्पमित्र

......................................