मुंबई : घाटकोपरला विमान कोसळून झालेल्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल १५ दिवसांत मिळेल, असे जरी सांगितले जात असले; तरी गेल्या दीड वर्षांतील एकाही विमान अपघाताचा अहवाल अजून न मिळाल्याने हा अहवाल वेळेत मिळण्याबाबत विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.या विमानाचा विमा उतरवण्यात आला होता. त्यामुळे विमा कंपनीच्या निरीक्षकांनीही अपघातस्थळाची पाहणी केली आणि आवश्यक त्या बाबींची नोंद घेतली. या विमानाला उड्डाणाचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचे समोर आल्याने विम्याची रक्कम मिळण्यासंदर्भात गुंतागुंत निर्माण झाली आहे.अपघात झाल्यापासून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए), एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) यांच्या पथकाने विमानाच्या अवशेषांची पाहणी केली होती.अॅल्युमिनियम टेपमुळे संशयाचे धुकेविमानाला अॅल्युमिनियम टेप लावल्याचे समोर आले आहे. ही टेप विमानाच्या छोट्या दुरुस्तीसाठी वापरली जाते. मात्र, या विमानाच्या छायाचित्रांत ती दिसत असल्याने तो बिघाड दुरुस्त करण्यापूर्वीच विमान उड्डाणाची घाई का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या टेपमुळे विमानात काही बिघाड असल्याचा संशय दृढ होत आहे. तो दूर केल्यानंतर उड्डाण करणे आवश्यक होते. मात्र, सुमारे नऊ वर्षे उड्डाण न केलेल्या विमानाला अशा परिस्थितीत उड्डाण करण्यास नेमके कोणी व का भाग पाडले, याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे म्हणणे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले. विमानाचे वैमानिक, सहवैमानिक व तंत्रज्ञांनी आपापल्या कुटुंबीयांना खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही उड्डाण करण्यात आले.रखडलेले अहवालयंदा जानेवारीत ओएनजीसीला सेवा पुरवणाऱ्या पवनहंस हेलिकॉप्टरच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर २०१६ मध्ये ‘जॉय राईड’ साठी गेलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने चालकासह दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. एप्रिल २०१७ मध्ये गोंदिया येथे नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाºया विमानाचा नदीपात्रात कोसळून अपघात झाला होता. त्यात प्रशिक्षकासहित प्रशिक्षण घेणाºया वैमानिकाचा मृत्यु झाला होता. या तिन्ही प्रकरणी अद्याप चौकशी अहवाल आला नसल्याने घाटकोपरच्या अपघाताचा अहवाल तरी १५ दिवसांत मिळणार का, असा प्रश्न विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांना पडला आहे.बघ्यांना रोखले : दुर्घटनास्थळाला भेट देण्यासाठी शनिवारी सकाळीही बघ्यांची गर्दी होती. पण पोलिसांनी ती रोखल्याने काही काळानंतर ती पांगली. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष पाहणे आणि विमान कोठून कसे पडले असेल, याचा अंदाज बांधण्याचे काम गर्दीतील मंडळी करत असल्याने तेथे रेंगाळणाºयांचे प्रमाण मोठे होते. पोलिसांनी घटनास्थळी पडदा लावून अपघातग्रस्त विमान नागरिकांच्या नजरेस पडणार नाही, याची काळजी घेतली. येथे बंदोबस्त लावून कोणालाही आत जाता येणार नाही, याची काळजी घेतली.
विमान अपघाताचा अहवाल पंधरवड्यात मिळण्याची शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:20 AM