मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरामधील घसरण मुंबई महापालिकेसाठी चिंतेची बाब ठरली आहे़ सलग दुसऱ्या वर्षी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्याचा फटका जकात उत्पन्नाला बसला आहे़ यंदा तर गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी जकात उत्पन्न जमा झाले आहे़ यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे़ याचा फटका पायाभूत सुविधा व प्रकल्पांसाठी राखीव निधींवर होण्याची शक्यता आहे़सरलेल्या आर्थिक वर्षात जकातीच्या उत्पन्नात नियोजनापेक्षा तब्बल ३७४ कोटींची तूट आली आहे. पालिकेच्या उत्पन्नातील ३९ टक्के भार जकात खाते पेलत आहे़ जकात महसुलात दर वर्षी सरासरी दहा टक्के वाढ अपेक्षित असते़ या महसुलातूनच पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करणे शक्य होत असते़ मात्र, सर्वाधिक जकात उत्पन्न मिळवून देणाऱ्या कच्च्या तेलाची किंमतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घटली़ याचा फटका पालिकेच्या जकात उत्पन्नाला बसला आहे़सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जकात कराच्या माध्यमातून ७९०० कोटी रुपये जमा होतील, असा पालिकेचा अंदाज होता़ मात्र, कच्च्या तेलाच्या रूपाने मिळणारे उत्पन्न घटल्यामुळे पालिकेने ६,६५० कोटी रुपयांचा सुधारित अंदाज तयार केला़, परंतु हा आकडाही चुकला असून, प्रत्यक्षात ६,२७६ कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत़ यापैकी कच्च्या तेलाच्या आयातीतून केवळ एक हजार ६०४ कोटी रुपये जमा झाले आहेत़ तेलावरच मदारदोन वर्षे सलग कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होत आहे़ या किमती २०१६-१७ या वर्षामध्ये वाढतील, अशी पालिकेला आशा आहे़ पालिकेने जकात कराच्या माध्यमातून सात हजार कोटी रुपये उत्पन्न या वर्षात जमा होईल, असा अंदाज आहे़घट अशी२०१४ -१५ या वर्षी कच्च्या तेलाच्या आयातीवर लावलेल्या जकात करातून २,२५५ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले होते़ मात्र, सरलेल्या आर्थिक वर्षात केवळ १,६०४ कोटी जमा झाले़कंपन्या मुंबईबाहेर गेल्याने...मोठ्या प्रमाणात आयात करणाऱ्या गोदरेज अँड बॉइस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन ट्युब्रो या मोठ्या कंपन्या मुंबईबाहेर गेल्याने, याचाही फटका जकात उत्पन्नाला बसला आहे़या सुविधांवर परिणाम होणारजकात उत्पन्नातूनच नागरी व पायाभूत सुविधांसाठी निधी राखून ठेवण्यात येत असतो़ यासाठी पालिकेला मिळालेल्या उत्पन्नापैकी ३९ टक्के उत्पन्न हे जकातीतून मिळत असते. मात्र, जकात उत्पन्नामध्ये घट झाल्याचा परिणाम रुग्णालय, रस्ते, प्राथमिक शिक्षण, तसेच विविध विकास प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात राखीव निधीवर होऊ शकतो़
तेलामुळे घसरले पालिकेचे उत्पन्न!
By admin | Published: April 10, 2016 2:02 AM