मुंबई : सत्तर वर्षीय वडील सुनेबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप करणाऱ्या मुलाला व सुनेला उच्च न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला. मुलाने व सुनेने वडिलांचा छळ करून त्यांच्यावरच गंभीर आरोप केला. त्यामुळे त्यांनी वडिलांचे घर सोडावे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.मुलगा व सून आपला छळ करीत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकाने उपजिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडे केली. आरोपांची सत्यता पडताळून उपजिल्हाधिका-यांनी मुलाला व सुनेला वडिलांचे घर सोडण्याचा आदेश २५ जून २०१८ रोजी दिला. या आदेशाला मुलाने व सुनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकेनुसार, मुलाचा विवाह १९ मार्च २०१७ रोजी झाला. त्यानंतर, मुलगा व सून वडिलांच्याच घरी राहात होते. दरम्यान, मुलगा घरात नसताना सास-याने सुनेच्या पाठीवर हात ठेवला. मात्र, घटना घडल्यानंतर एका वर्षाने सुनेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. वडिलांचे चारित्र्य चांगले नसल्याचे मुलाला शेजा-यांकडूनही कळले. मात्र, स्वतंत्र घर घेण्याची ऐपत नसल्याने वडिलांच्याच घरात राहावे लागते. उपजिल्हाधिका-यांना मुलगा व सुनेला घर सोडण्याचा आदेश देण्याचा अधिकार नाही. त्यांनी कायद्यानुसार त्यांना सुनावणी दिली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.मात्र, वडिलांनी सर्व आरोप फेटाळले. ‘मुलगा व सून माझा छळ करतात. जेवण देत नाहीत, घराची चावीही देत नाहीत. ते कामावरून येईपर्यंत म्हणजे रात्री साडेदहापर्यंत घरात घेत नाहीत. याबाबत मी उपजिल्हाधिका-यांकडे तक्रार केल्यावर सुनेने माझ्यावर चारित्र्यावरून आरोप केला,’ असे वडिलांनी न्यायालयाला सांगितले.पुराव्यांवरून उच्च न्यायालयाने वडिलांची बाजू योग्य ठरविली. सास-यांनी तक्रार केल्यानंतर सुनेने सास-यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. घटना घडल्यानंतर एक वर्षाने त्यांनी तक्रार का केली? गंभीर आरोप करूनही वडिलांच्या घरात राहण्याचा कोणता कायदेशीर अधिकार त्यांना आहे, हे याचिकाकर्त्यांचे वकील सिद्ध करू शकले नाहीत. याचिकाकर्ते वडिलांवर बेजबाबदार आरोप करत आहेत आणि त्यांना वडिलांच्या घरात राहायचेही आहे. उपजिल्हाधिका-यांनी दिलेला आदेश योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले....तर पोलीस कारवाई करणारएका आठवड्यात घर न सोडल्यास पोलिसांना कारवाई करण्याचा आदेशही दिला, तसेच या काळात वडिलांची छळवणूक करायची नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, अशी तंबीही न्यायालयाने मुलगा व सुनेला दिली.
वडिलांच्या चारित्र्यावर संशय घेणे भोवले, मुलासह सुनेला घर सोडावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 1:46 AM