सदोष विद्युत जोडणीमुळे मुंबईत आगीचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:02 AM2019-01-21T05:02:06+5:302019-01-21T05:02:13+5:30
सदोष विद्युत जोडणीमुळे मुंबईत आगीचा धोका वाढला असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : सदोष विद्युत जोडणीमुळे मुंबईत आगीचा धोका वाढला असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत बहुतांशी ठिकाणी शॉर्ट सर्किट हेच आगीचे मुख्य कारण होते. याची गंभीर दखल घेऊन महापालिकेने मुंबईतील सर्व वीज तसेच गॅस वितरण कंपनीला नियमित तपासणीची सूचना केली आहे.
मुंबईत गेल्या वर्षभरात मोठ्या आगींचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होणे अथवा गॅस गळतीमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्याचबरोबर प्रतिबंधक उपाय म्हणून विद्युत जोडणीची नियमित तपासणी करण्याचा सुचनाही संबंधित कंपन्यांना करण्यात आली आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये टिळक नगर येथील १५ मजल्यांच्या सरगम सोसायटीत आग लागून पाचजणांचा मृत्यू झाला. या आगीच्या चौकशीत सदोष विद्युत यंत्रणेतून ठिणगी उडून क्रिस्मसनिमित्त सजविलेल्या झाडावर पडली. ज्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याचे चौकशी अहवालातून निष्पन्न झाले. या घटनेची गंभीर दखल घेऊन आपत्कालिन व्यवस्थापन कायदा २००५ कलम ३० अंतर्गत ही सुचना करण्यात आली आहे.
>३५ हजार आगी शॉर्ट सर्किटमुळे
दहा वर्षात ५५ हजार आगीच्या घटना. यापैकी ३५ हजार आगीचे मुख्य कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे.
टिळक नगर येथील १५ मजल्यांच्या सरगम सोसायटीत आग लागून पाचजणांचा मृत्यू झाला. सदोष वायरींगमुळे ठिणगी उडून सिलेंडरच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका.
आपत्कालिन व्यवस्थापन कायदा २००५ कलम ३० अंतर्गत खबरदारी व प्रतिबंधक उपाय करण्याची संबंधित यंत्रणांना ताकीद देण्याचे अधिकार महापालिकेला आहेत.