आचारसंहितेच्या भीतीने धावपळ सुरू
By admin | Published: September 9, 2014 11:53 PM2014-09-09T23:53:16+5:302014-09-09T23:53:16+5:30
राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला एका मागोमाग धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आ. कृष्णा घोडा हे सेनेत दाखल झाले
दिपक मोहिते, वसई
राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला एका मागोमाग धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आ. कृष्णा घोडा हे सेनेत दाखल झाले त्यामागोमाग काँग्रेसचे शंकर नमही शनिवारी शिवबंधनामध्ये अडकले. यापूर्वी काँग्रेसचे उदयबंधू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी समोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातून स्थानिक नेतृत्व कसा मार्ग काढते यावर निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत.
वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यावरून काँग्रेस पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. नालासोपारा येथे पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे ही निवडणुक लढवण्याऐवजी सहयोगी पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याच्या निर्णयाप्रत काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते आले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो व जिल्हापरिषदेचे माजी सदस्य समीर वर्तक या दोघांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्यावेळी उमेदवारीस नकार देणाऱ्या मायकल फुर्ट्याडो यांनी यावेळी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. अल्पसंख्यांक असल्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. पालघर येथे काँग्रेसतर्फे राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे असून त्यांच्यासमोर सेनेचे कृष्णा घोडा कडवे आव्हान उभे करतील अशी शक्यता आहे. या लढाईमध्ये घोडा यांना इतर राजकीय पक्षांचीही मदत होईल असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. डहाणू येथे मार्क्सवाद्यांशी दोन हात करण्याकरीता राष्ट्रवादीकडे उमेदवाराची उणीव आहे. सेनेचीही अशीच काहीशी परिस्थिती होती परंतु माजी गृहराज्यमंत्री शंकर नम यांनी प्रवेश केल्यामुळे सेनेचा उमेदवार शोध संपुष्टात आला आहे.
डहाणू येथे मात्र राष्ट्रवादी काँगे्रसची अवस्था अधिक बिकट झाली आहे. प्रभावी उमेदवार देण्यासाठी त्यांच्याकडे कोणीच नसल्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विक्रमगड येथेही राष्ट्रवादीकडे विजयश्री खेचून आणेल असा उमेदवार नसल्यामुळे स्थानिक नेतृत्व संभ्रमावस्थेत सापडले आहे. गेल्यावेळी येथे निवडून आलेले भाजपाचे अॅड. चिंतामण वनगा खासदार झाल्यामुळे त्यांच्याजागी भिवंडी ग्रामीणचे आ. विष्णु सावरा यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. परंतु सावरा यांनाही स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे दिसून येत आहे. पालघर, वसई वगळता इतर ४ मतदारसंघात साऱ्याच राजकीय पक्षांपुढे उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत स्थानिक नेतृत्वाचा कस लागणार आहे. एकेकाळी पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघाचे बुरूज कोसळल्यामुळे पक्षनेतृत्व हवालदिल झाले आहे.
निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होऊन आचारसंहितेचा अंमल सुरू होईल त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आता आपापली कार्यालये थाटण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकजणांनी उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पक्षकार्यालय उघडण्याचा धूमधडाका लावला आहे. महायुती व आघाडीमध्ये जागावाटपावरून सध्या वादंग निर्माण झाल्यामुळे उमेदवारांची यादीही जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. बंडखोरीची लागण मोठ्या प्रमाणात लागू नये म्हणून आघाडीतील घटकपक्ष आपले उमेदवार उशीराने जाहीर करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु या खेळीमुळे मात्र इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा जीव मात्र टांगणीला लागतो. बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार नक्की केल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे सेनेच्या गोटात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल नाही.