आर्थिक नुकसानीमुळे रिगल सिनेमागृहाला लागणार टाळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:26 AM2018-11-10T07:26:16+5:302018-11-10T07:26:33+5:30
कुलाबा कॉजवेजवळ गेली ८५ वर्षे दिमाखात उभे असणाऱ्या रिगल सिनेमागृहाला टाळे लागणार आहे. गेल्या वर्षभरात जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे रिगल सिनेमागृह चालविणे शक्य नसल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अजय परचुरे
मुंबई - कुलाबा कॉजवेजवळ गेली ८५ वर्षे दिमाखात उभे असणाऱ्या रिगल सिनेमागृहाला टाळे लागणार आहे. गेल्या वर्षभरात जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्यामुळे रिगल सिनेमागृह चालविणे शक्य नसल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिगल सिनेमागृह मुंबईतील सर्वांत जुने सिंगल स्क्रीन, वातानुकूलित असलेले पहिलेच सिनेमागृह आहे. या सिनेमागृहाची ११६० सीट्सची
क्षमता आहे. परंतु आता सिनेमागृहाचा व्यवसाय घसरून १५ ते २० टक्क्यांवर आला आहे. मल्टिप्लेक्स तिकिटांच्या पाचशे ते हजार रुपयांच्या तुलनेत रिगलचे दर दीडशे ते अडीचशे रुपये इतके आहेत. मात्र, सध्या मल्टिप्लेक्सलाच प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे. त्यातच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते सिनेमांचे मार्केट पाहून तिकिटांचे दर वाढवतात. त्यामुळे त्यात अनेक जण आपल्या मेहनतीचा वाटाही घेतात. ब्रिटिशकालीन असलेल्या या दोन मजली सिनेमागृहात आणखी दोन स्क्रीन आणि एक फूड कोर्टबाबत बोलणी सुरू आहेत. परंतु त्यासाठी मुंबईतील कोणत्याही प्रतिष्ठित मल्टिप्लेक्स चालकाने प्रतिसाद न दिल्याची माहिती रिगल सिनेमागृहाचे संचालक कमल सिधवा तारापोरवाला यांनी दिली.
दोन मजल्यांच्या या सिनेमागृहाच्या इमारतीची रचना ब्रिटिशकालीन आर्किटेक्चर चार्ल्स स्टीव्हन्स आणि कर्ल शारा यांनी केली होती. सध्या कमल सिधवा तारापोरवाला आणि त्यांचा चुलतभाऊ जल टाटा हे रिगल सिनेमागृहाच्या संचालकपदी आहेत.
...म्हणूनच निर्णय
गेल्या वर्षभराचा लेखाजोखा काढला असता रिगल सिनेमागृहाला एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सद्यपरिस्थितीत हे इतके मोठे नुकसान भरून काढणे शक्य नसल्याने हे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय चालकांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईचे वैभव असलेले ८५ वर्षे जुने रिगल थिएटर आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.