बदलापूर : बदलापुरात २७ जुलै रोजी आलेल्या महापुराने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अनेक इमारतींमध्ये पाणी गेल्याने भिजलेले घरांतील साहित्य नागरिकांनी फेकले आहे. ते सामान पालिका प्रशासनाने अद्याप तरी उचललेले नाही. कचºयाचे प्रमाण वाढत असून, त्या प्रमाणात ढिगारे उचलण्यासाठी यंत्रणा काम करत नसल्याचा आरोप हेंद्रेपाड्यातील नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले असून, कचरा उचलण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरात भिजलेले सामान घराबाहेर फेकले जात असल्याने या वाढत्या कचºयामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
बदलापुरातील पुराचे पाणी ओसरल्यावर नागरिकांनी आपल्या संसाराची आवराआवर सुरू केली आहे. हेंद्रेपाडा, रमेशवाडी, वालिवली आणि उल्हास नदीच्या किनारी असलेल्या इमारतींमध्ये पाणी गेल्याने तळमजल्यावरील आणि काही ठिकाणी पहिल्या मजल्यावरील घरांत पाणी शिरले होते. नागरिकांनी तत्काळ घराला कुलूप लावून आपला जीव वाचवला. आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर घरातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे. घरातील अनावश्यक वस्तू, धान्य, गादी, सोफे अशा अनेक वस्तू नागरिकांनी कचºयात टाकल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कचºयाचे ढीग वाढत आहेत. पालिका प्रशासन कचरा उचलण्याचे काम करत असले, तरी कचºयाचे प्रमाण जास्त असल्याने अनेक ठिकाणी ढिगारे तसेच पडून आहेत. अनेक दुकानांतही पुराचे पाणी गेल्याने दुकानातील धान्यसाठा आणि इतर वस्तूदेखील कचºयात फेकल्या गेल्या आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खराब वस्तू सोसायटीच्या बाहेर फेकल्या आहेत. त्यातील काही कचरा उचलला जात आहे, तर काही कचरा अजूनही तसाच पडून असल्याचे चित्र दिसत आहे. हेंद्रेपाडा भागात अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचºयाचे ढिगारे दिसत आहेत. काही सोसायट्यांमध्ये आतच कचºयाचे ढीग करून ठेवण्यात आले आहेत. धान्यसाठादेखील उघड्यावर टाकण्यात येत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे.अयोध्यानगरी, भारत कॉलेज रोड, रेनी रिसॉर्ट रोडवरील काही सोसायट्यांच्या बाहेर कचºयाचे ढिगारे साचले आहेत. नागरिकांनी घराची साफसफाई केली असून, त्यांना अजूनही कोणतीच मदत मिळालेली नाही. शासकीय पंचनामेदेखील अजून न झाल्याने भरपाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती वालिवली भागातदेखील आहे. रितू वर्ल्ड संकुलातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तिथेही धान्य आणि घरातील कचरा बाहेर फेकण्यात आला आहे.अनेक गाड्यांचे नुकसानमहापुरामुळे सोसायट्यांमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये सर्व गाड्या पाण्याखाली आल्या होत्या. बदलापूरच्या ज्या भागाला पुराचा फटका बसला, त्या परिसराची पाहणी केली असता, पाचशेहून अधिक चारचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. याशिवाय, दुचाकींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या चारचाकी गाड्या टोइंग करून दुरुस्तीसाठी हलविण्याचे काम सुुरू आहे.काही इमारतीमधील नागरिकांनी खराब वस्तू सोसायटीबाहेर फेकल्या आहेत. गाड्यांचीही वाईट अवस्था आहे.