मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेचे उत्पन्न बुडते. त्यामुळे अशा प्रवाशांवर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पश्चिम रेल्वेने गेल्या तीन महिन्यांपासून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उचलत, दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत २0 कोटी ६२ लाख रुपयांची भर पडली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच उपनगरीय लोकलही धावतात. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतानाच, पश्चिम रेल्वेला त्यातून चांगले उत्पन्न मिळते. मात्र, काही फुकट्या प्रवाशांमुळे प्रवासी उत्पन्न बुडते. त्याविरोधात पश्चिम रेल्वेकडून कारवाई केली जाते. डिसेंबर २0१६ आणि २0१७च्या जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ३४ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल २0 कोटी ६२ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात १ लाख ७८ हजार विनातिकीट प्रवासी पकडले आणि ७ कोटी ३६ लाखांचा दंड वसूल केला. ही कारवाई करतानाच, महिलांच्या आरक्षित डब्यातून १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरीही अशा डब्यातून प्रवास करणाऱ्या २0१ विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
फुकट्या प्रवाशांमुळे प.रे.च्या तिजोरीत वाढ
By admin | Published: March 23, 2017 1:56 AM