मुंबई : पुढच्या रविवारी बाप्पाला निरोप द्यायचा असल्याने पुन्हा सुट्टी मिळणार नाही, हे गृहीत धरून मुंबईच्या विविध भागांत भाविकांची अलोट गर्दी झाली होती. वेगवेगळ्या गल्लीतील राजा, इतर मंडळांची आरास, रोषणाई पाहण्यासाठी दिवसभर आबालवृद्धांची तुडुंंब गर्दी पाहायला मिळाली.सर्वच ठिकाणी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परळ येथे नरेपार्क मैदानात भरलेली जत्रा पाहण्यासाठीही गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत या जत्रेत खवय्येगिरी करत, विविध खेळांचा आस्वाद घेत, लहान-मोठे सगळेच आनंद लुटताना दिसले. याशिवाय, गिरणगावातून भक्तगणांचा मोर्चा खेतवाडीच्या दिशेने वळताना दिसला. खेतवाड्यांतील गणेशोत्सव हा तेथील उंच मूर्तींसाठी आणि विशेष रूपातील बाप्पांसाठी प्रसिद्ध आहे. अन्य शहरांतून मुंबईत सहकुटुंब येणाऱ्यांची गर्दी खरेतर गौरी विसर्जनानंतर होते. पण त्यानंतर सुटी नसल्याने बहुतांश भाविकांनी रविवार सवहकुटुंब बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी कारणी लावला. त्यामुळे शहरासह उपनगरातदेखील ठिकठिकाणी बस, रिक्षा, टॅक्सीसाठी गर्दी झाली होती.
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी रविवार लावला कारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 6:00 AM