मुंबई : एकवेळ देशभरातील सर्व प्रदेश, विभागीय काँग्रेसमधील गटबाजी संपेल; पण, मुंबई काँग्रेसमधील गटबाजी संपणार नाही, अशी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची ठाम भावना आहे. अंतर्गत विरोधामुळेच मला अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याचे मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी सांगितले.उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात अध्यक्षपद सोडावे लागल्यानंतर निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. चार वर्षे तीव्र विरोधानंतरही मुंबई अध्यक्ष म्हणून आक्रमकपणे काम केल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. निवडणुकीच्या तोंडावर मला अध्यक्षपदावरून हटवले असले तरी माझ्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. मला आता उत्तर पश्चिमचा उमेदवार म्हणून प्रचार करण्यासाठी अधिक अवधी मिळेल. मला हटविल्यानंतर तरी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी थांबते का, हे पाहावे लागेल. मुंबई काँग्रेसमधील गटबाजी संपू शकते, असा विश्वास पक्षनेतृत्वाला देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचेही निरूपम म्हणाले.तीस वर्षांपासून मी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात राहत आहे. या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मिळावे, ही माझी इच्छा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळे पूर्ण झाल्याचे निरुपम म्हणाले. शिवसेना-भाजपाचे सरकार आल्यापासून या विभागात मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न आहे. रोगराई, साफसफाई, नाल्यांची समस्या, चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते या समस्यांबरोबरच लोकांना स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळत नाही ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळेच मी उत्तर पश्चिम विभागासाठी स्वतंत्र, वेगळा आणि सर्व समस्यांचे निराकरण करणारा जाहीरनामा तयार करणार आहे. विजयी झाल्यास त्यानुसार काम करेन. या विभागातील ‘आरे बचाव’चे आंदोलन यापुढेही सुरू राहील. आरे परिसर हा मुंबईचा श्वास आहे, आरे वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
गटबाजीमुळेच पायउतार व्हावे लागले - संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 2:59 AM