Join us

मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा; रेल्वे वाहतुकीवर परिणाम तर शाळांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 8:20 AM

मध्य रेल्वेवर  कुर्ला, घाटकोपर, सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ठाणे ते मुंबई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, मनमाड-एलटीटी एक्सप्रेस रद्द, नागपूर-मुंबई नंदीग्रामध्ये एक्सप्रेस नाशिकहून वळवली आहे.

मुंबई - शहर आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेवर  कुर्ला, घाटकोपर, सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ठाणे ते मुंबई रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, मनमाड-एलटीटी एक्सप्रेस रद्द, नागपूर-मुंबई नंदीग्रामध्ये एक्सप्रेस नाशिकहून वळवली आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. 

डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या पुण्याजवळ थांबविण्यात आल्या आहे. मुंबईतील लोकल सेवांवर पावसाचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. रेल्वे स्टेशनवर उद्घोषणा करुन अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा ठप्प झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते वांद्रे, वाशी ते पनवेल वाहतूक सुरु आहे, तर ट्रान्सहार्बर ठाणे-वाशी-पनवेल सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. वसई-विरारहून निघणाऱ्या ट्रेन्स 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर वातानुकुलनित ट्रेन्स आज दिवसभरासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. 

नालासोपारा स्टेशनवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वसई-विरार लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. तर मध्य रेल्वेवर सायन-कुर्ला येथे पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-वापी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे, सुरत-विरार पॅसेंजर डहाणूपर्यंत चालविण्यात येत आहे. अहमदाबाद-मुंबई एक्सप्रेस वापीजवळ थांबविण्यात आली आहे. वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटरेल्वेपाऊस