Join us

जास्त मागणीमुळे छोट्या माशांची पैदास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 11:36 PM

छोट्या प्रकारच्या पापलेट माशांच्या जास्त मागणीमुळे त्यांची पैदास धोक्यात आल्याची खंत समुद्रीजीव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

- सागर नेवरेकर मुंबई : छोट्या प्रकारच्या पापलेट माशांच्या जास्त मागणीमुळे त्यांची पैदास धोक्यात आल्याची खंत समुद्रीजीव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये पापलेट माशांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. वर्सोव्यातील मत्स्य संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पापलेटचे उत्पादन २०१६-१७ सालाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ४८ टक्क्यांनी घट झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून समुद्रामध्ये पापलेट माशांची घट झाल्याचे दिसून येते. मच्छीमारांकडून छोट्या पापलेटच्या केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे हा मासा कमी झाला आहे. छोट्या पापलेट माशांना बाजारात मोठी मागणी असल्यामुळे मच्छीमार जाळ्यामध्ये सापडलेले छोटे पापलेट समुद्रात न फेकता बाजारात विकण्यासाठी घेऊन येतात. सरंगा, हलवा आणि चायनिज पापलेट (कलेट) असे पापलेटमध्ये तीन प्रकार आढळून येतात. ट्रोल नेट, गील नेट आणि डोल नेट या जाळ्यांमध्ये तिन्ही प्रकारचे मासे पकडले जातात. पापलेट माशांबद्दल मच्छीमारांमध्ये जनजागृती होणे गरजेची आहे. मच्छीमारांनी छोट्या आकारातील पापलेट व सुरमई मासे पकडून नये. डॉकवर देखरेख ठेवली पाहिजे. पापलेट माशांच्या पैदासादरम्यान समुद्रात मासेमारी करू नये, अशी माहिती समुद्रीजीव अभ्यासक स्वप्निल तांडेल यांनी दिली.हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मासे खाणारे नागरिक यांची पहिली मागणी ही पापलेट व सुरमई माशांची असते. काही मासे चीन, जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांत पाठविले जातात. पापलेट आणि सुरमईच्या जास्त मागणीमुळे आता त्यांच्या संख्येत घट होत आहे. मच्छीमार संघटनेमार्फत तुमच्या मेनू कार्डमध्ये पापलेट व सुरमई मासे न घेता दुसरे मासे घ्या, अशा प्रकारची जनजागृती सुरू आहे, अशी माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे संचालक गणेश नाखवा यांनी दिली.>लहान जाळ्यांचा वापरशासनाच्या नियमानुसार जाळ्याचा आकार १४ मिलीमीटर असला पाहिजे. परंतु ट्रॉलिंग व बॅगनेट जाळ्याचा आकार १०-१५ मिलीमीटर असतो. या जाळ्यामधूनच बरेच मासे पकडले जातात. मच्छीमार पापलेट पकडण्याच्या नादात इतर प्रकारचे मासेही पकडले जातात. परंतु पापलेट मासे बऱ्यापैकी मिळाल्यावर दुसरे मासे पुन्हा समुद्रात फेकले जातात.