पालिकेचा हायटेक कारभाराला हरताळ
By admin | Published: April 13, 2016 02:56 AM2016-04-13T02:56:15+5:302016-04-13T02:56:15+5:30
नागरी सेवा आॅनलाइन करून कारभार हायटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे़ पालिकेची ओळख करून देणारे संकेतस्थळच गेल्या पाच वर्षांत
मुंबई : नागरी सेवा आॅनलाइन करून कारभार हायटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे़ पालिकेची ओळख करून देणारे संकेतस्थळच गेल्या पाच वर्षांत अपडेट झालेले नाही़ त्यामुळे या संकेतस्थळावर आजी नगरसेवकांबरोबरच माजी नगरसेवकांची नावे झळकत आहेत़ प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे़
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आॅनलाइन तंत्रज्ञान विकसित करून महापालिकेच्या कारभाराचा दर्जा वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे़ या अंतर्गत पालिकेचा कारभार पेपरलेस करण्याचेही काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे़ आॅनलाइन सुविधांतर्गत पाणीपट्टी, मालमत्ता कर, परवाना शुल्क आदी सेवा नागरिकांना पुरविण्यात येत आहेत.
ही प्रणाली कार्यरत असली तरी ती अपडेट करण्याची तसदी माहिती तंत्रज्ञान विभाग घेत नसल्याचे दिसून येत आहे़ अधिकाऱ्यांच्या या उदासीन धोरणामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत़ सन २०१२मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर विजयी उमेदवारांबरोबर वर्णी न लागलेल्या उमेदवारांच्या पक्षनिहाय नावांचा उल्लेख करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
काही उदाहरणे अशी
- ए, बी, ई प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विनोद शेखर यांचे नाव आहे़ प्रत्यक्षात त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुषमा शेखर निवडून आल्या आहेत़
- सी, डी प्रभागात काँग्रेसच्या अनहिता मेहता यांचे नाव आहे़ मात्र त्यांच्या जागी आता नौशीर मेहता नगरसेवक आहेत़
- नगरसेवकांसह अनेक आमदारांची नावेदेखील अपडेट करण्यात आलेली नाहीत.