समुद्रातील भरतीमुळे कुर्ला ते दादरदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 05:16 PM2019-08-03T17:16:40+5:302019-08-03T17:17:08+5:30
भरतीमुळे कुर्ला, सायन आणि चुनाभट्टी परिसरात पाणी साचले आहे.
मुंबई : समुद्रातील भरती आणि पावसाचा जोर यामुळे आज दुपारनंतर पुन्हा मुंबई ठप्प झाली असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा दोन वाजल्यापासून खोळंबली आहे.
भरतीमुळे कुर्ला, सायन आणि चुनाभट्टी परिसरात पाणी साचले आहे. यामुळे वडाळा ते वाशी आणि दादर ते कुर्ला मार्ग ठप्प झाले आहेत. लोकल गेल्या तीन तासांपासून खोळंबलेल्या असल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून पायी जवळचे स्टेशन गाठले. मात्र, पर्यायी व्यवस्थाच अपुरी असल्याने सर्वांना त्रास सहन करावा लागला.
हार्बर मार्गावर चेंबूर स्थानकाच्या बाजुने पुलाखाली रेल्वे रुळांवर मलबा कोसळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने पुलाचा मलबा नसून दुभाजकाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
या काळात वाशी-पनवेल, सीएसएमटी- बांद्रा, गोरेगाव; सीएसएमटी- दादर फास्ट; कुर्ला ते ठाणे, कल्याण, कर्जत कसारा; ट्रान्सहार्बर आणि उरण मार्ग सुरु आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.