दुरावस्थेमुळे विद्यार्थी खासगी शाळेच्या वाटेवर
By admin | Published: April 8, 2015 12:30 AM2015-04-08T00:30:20+5:302015-04-08T00:30:20+5:30
भायंदरपाडा ओवळा ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेने १९७० मध्ये बांधलेली ठाणे महापालिकेची शाळा क्र. ५८ ही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुरी पडत आहे.
नामदेव पाषाणकर, घोडबंदर
भायंदरपाडा ओवळा ग्रामपंचायत असताना जिल्हा परिषदेने १९७० मध्ये बांधलेली ठाणे महापालिकेची शाळा क्र. ५८ ही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपुरी पडत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी नजीकच्या खासगी शाळांचा आश्रय घेऊ लागली आहेत. मोठमोठ्या इमारतीच्या संकुलापुढे गरिबांची घरे दृष्टीआड होत असून या संकुलात येणाऱ्या रहिवाशांची सोय म्हणून विकासक खासगी शाळा सुरु करीत आहेत. काही गाववाल्यांकडे जमिनीचे तसेच व्यवसायाचे पैसे आल्यामुळे त्यांनी मुले येथे घालण्यास सुरु वात केली आहे.
ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. शाळेचा सप्टेंबर २०१४ चा एकूण पट अवघा १७३ आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेचा पट कमीत कमी ३० असायला हवा. या नियमानुसार शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. त्यानुसार येथेही एक शिक्षक कमी आहे. मनपा शाळेचे दोन वर्ग अपुरे पडतात, म्हणून नकुल कासार यांच्या इमारतीतील दोन गाळे प्रत्येकी दीड हजार भाडे देऊन घेण्यात आलेत. या गाळ्यात मुले कोंदट वातावरणात शिकत आहेत. नागलाबंदर, भायंदरपाडा, पोलीस चौकी चाळ येथील मुले शाळेसाठी येतात. शाळा जूनी झाल्याने ती पावसाळ्यात गळते. तीन वर्षापासून भाड्याने घेतलेल्या शाळेच्या दोन गाळ्यांचे भाडे पालिकेने दिलेले नाही. भाडे न मिळाल्यास ते दोन वर्ग बंद होऊ शकतात. या संदर्भात शिक्षण मंडळाकडे विचारणा केली असता शाळेचे भाडे देण्याचा प्रस्ताव तयार असून थकीत भाडे लवकरच दिले जाईल, असे सांगितले गेले.