मुंबई : मुलुंडमधील भाजपा - शिवसेना यांच्यात झालेल्या राडाप्रकरणातील अटकेत असलेल्या १४ शिवसैनिकांना आणखीन एक दिवस कोठडीची हवा खावी लागणार आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करता आला नाही. त्यामुळे शनिवारी कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील पोलिसांना हवे असलेले आणखी दोन शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.मुलुंड न्यायालयाने न्यायालयीन कोठडीतील १४ शिवसैनिकांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र शुक्रवारी कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करता आला नाही. त्यामुळे त्यांना आणखी एक दिवस कोठडीत काढावा लागला. शनिवारी कागदपत्रांची पूर्तता करून सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी ’लोकमत’शी बोलताना दिली. पोलिसांनी हवे असलेलेआरोपी संजय जाधव आणि अरुण येरुणकरही शुक्रवारी नवघर पोलीस ठाण्यात हजर झाले. नवघर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. शिवसेना - भाजपा राडा प्रकरणातील व्हिडीओ क्लिप तपासणीसाठी चार पोलिसांचे पथक तयार केले असून वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहेत. पोलिसांकडून पक्षपाती वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलिसांनी फक्त वरिष्ठांच्या दबावामुळे सेना कार्यकत्यांविरुद्धच गुन्हा दाखल केल्याचे सेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अपूर्ण कागदपत्रांमुळे वाढली कोठडीची हवा
By admin | Published: October 15, 2016 7:08 AM