अकरावीच्या जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:58 AM2019-06-19T04:58:06+5:302019-06-19T04:58:24+5:30

निर्णय रद्द करावा; शिक्षक संघटनेची मागणी

Due to the increase of eleven, junior college teachers fear the excess | अकरावीच्या जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

अकरावीच्या जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

Next

मुंबई : अकरावीच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी नवीन शालेय शिक्षणमंत्र्यांनी अकरावीच्या जागांत शाखानिहाय वाढ करणार असल्याचे घोषित केल्यावर, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने मात्र त्याला विरोध दर्शविला आहे. अकरावीच्या तुकड्यांत आधीच १२० विद्यार्थ्यांची तुकडी असताना, त्यात अधिक विद्यार्थ्यांची भर घालणे शैक्षणिकदृष्ट्या अनुचित असल्याचे मत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने नोंदविले आहे.

अकरावीच्या जागावाढीमुळे विद्यार्थ्यांचे तर नुकसान होणारच आहे. मात्र, यामुळे शिक्षकांचाही भार वाढणार असून, ते अतिरिक्त होण्याची भीतीही मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी व्यक्त केली. सोबतच नामांकित महाविद्यालयातील जागावाढीमुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ओढा साहजिकच कमी होईल. एका वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सरासरी १०० विद्यार्थी जरी कमी झाले, तरी एकदम ८० तुकड्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे साहजिकच हजारो शिक्षकही अतिरिक्त होऊ शकतात, अशी माहिती दीक्षित यांनी दिली. त्यामुळे अचानक करण्यात येणारी ही जागवाढ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहेच. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या नोकरीवरही यामुळे गडांतर येणार असल्याने, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने याला विरोध दर्शविला आहे.

मागण्यांचे निवेदन देणार
या सर्व पार्श्वभूमीवर १२० विद्यार्थ्यांच्या तुकडीमागे जागा वाढविण्याचा निर्णय सरकारने रद्द करावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.
सोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील तुकडीमागे ८० तर शाळांतील तुकडीमागे ६० विद्यार्थी हा नियम पुन्हा लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यासाठी ते बुधवारी शिक्षक उपसंचालक कार्यालयावर धडक देणार असून, आपले मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना देणार असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली आहे.

Web Title: Due to the increase of eleven, junior college teachers fear the excess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक