वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्र तापू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:40 AM2019-03-05T05:40:53+5:302019-03-05T05:41:01+5:30
मुंबईचे किमान तापमान सोमवारी २०.४ अंश नोंदविण्यात आले आहे. तर कमाल तापमानाची नोंद २९.६ अंश झाली आहे.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान सोमवारी २०.४ अंश नोंदविण्यात आले आहे. तर कमाल तापमानाची नोंद २९.६ अंश झाली आहे. मुंबईच्या किमान तापमानात काही अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर कमाल तापमानात काही अंशी घट नोंदविण्यात आली आहे. कमाल तापमान ३२ अंशाहून २९ अंशावर खाली घसरले आहे. कमाल तापमानातील घसरणीमुळे हवेत किंचित गारवा असला तरीदेखील दिवसा पडणारे ऊन मुंबईकरांचा घाम काढत आहे. दुसरीकडे राज्यातील जवळजवळ सर्वच शहरांचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात येत असून, वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्र तापू लागला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सर्वांत जास्त कमाल तापमान सोलापूर येथे ३७.९ तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे.
>उत्तर कोकणात ढगाळ वातावरण
मालेगाव, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर गेले आहे. परिणामी, येथे उन्हाचा तडाखा बसत असून, उत्तर कोकणात मात्र किंचित ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले आहे.