मनोहर कुंभेजकर
मुंबई : नेमेची मग येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी मातोश्री परिसर कलानगर, सरकारी कर्मचारी वसाहत, गांधीनगर, खेरनगर, जयहिंद नगर, जवाहर नगर ,इंदिरा नगर, मराठा कॉलनी, पटेल नगर, हनुमान टेकडी, गोळीबार, डवरी नगर येथील सखल भागात पावसाळ्यात पाणी साचत होते. त्यामुळे याठिकाणी पाणी साचू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घातले. राज्याचे परिवहनमंत्री अँड.अनिल परब यांच्या सूचनेनुसार प्रि.विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे महापौर असतांना मिठी नदीचे पाणी उलट येऊ नये म्हणून मिठी नदीवर पूरनियंत्रण झडपा (फ्लड गेट्स ) बसवण्याचा निर्णय झाला.
आता हे काम पूर्ण झाले असून यंदाच्या पावसात खेरवाडी विधानसभा मतदार संघात पाणी तुंबले नाही.सदर कामाची नुकतीच माजी महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर यांनी पाहाणी केली. यावेळी विधानसभा समन्वयक अनिल त्रिंम्बककर, नगरसेविका रोहिणी कांबळे, मनपा अधिकारी बारापात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नंदादीप कल्व्हर्ट येथील ग्रीन रोड नाला येथे २ ठिकाणी ५० एचपीचे ३ पंप बसवुन पूर नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायन धारावी आउटफॉल येथे एकाच ठिकाणी ५० एचपीचे २ पंप बसवून २ पूर नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. एम.एम.आर.डी.ए.कार्यालयाजवळ जतवन उद्यानात ५० एचपीचा १ पंप बसवून पूर नियंत्रण झडप कार्यान्वित करण्यात आल्या आहे.बी.के.सी. मेट्रो आऊटफॉल येथे ५० एचपीचा १ पंप बसवुन पूर नियंत्रण झडप कार्यान्वित करण्यात आली. हरी मंदिर रोड येथे रोड लगतच्या दोन्ही पर्जन्य जलवाहिन्या येथे २ ठिकाणी ५० एचपीचे २ पंप बसवुन पूर नियंत्रण झडपा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. बी.के.सी. इंदिरा नगर आऊटफॉल येथे ५० एचपीचे २ पंप बसविण्यात येत आहेत. तसेच कलानगर परिसरामध्ये पूर नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी साहित्य सहवास, आक्केर्ड इमारत, मातोश्री मैदान तसेच जगतविद्या सोसायटी येथे स्वतंत्र पंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा खेरवाडी विधानसभा मतदार संघातील सखल भागात पाणी साचले नाही अशी माहिती प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतला दिली.