Join us

Corona Vaccine : पुरेसा साठा नसल्याने लसीकरण मोहीम पुन्हा अडचणीत; सरकारी - पालिका केंद्रही रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 9:32 PM

४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद. ३३ केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी मर्यादित साठा शिल्लक

ठळक मुद्दे४० खासगी केंद्रांवर लसीकरण आज बंद. ३३ केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी मर्यादित साठा शिल्लक

मुंबई - कोविड प्रतिबंध लसीकरणाचा निर्णायक टप्पा १ मे पासून सुरू होत असताना मर्यादित साठा उपलब्ध असल्याने ही मोहीमच अडचणीत आली आहे. लसींचा साठा संपुष्टात आला असल्याने गुरुवारी ४० खासगी केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तर उर्वरित ३३ केंद्रांवरही दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य व साठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे. तर लसींचा साठा उपलब्ध झाल्यास सरकारी आणि पालिका केंद्रांवर गुरुवारी उशिरा लस देण्यात येईल.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत सुमारे २४ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या सरकारी व महापालिकेची ६३ तर खाजगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. मात्र, लसीचा साठा  महापालिकेला मर्यादित स्वरुपात मिळत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण बंद करावे लागत आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने उपलब्ध साठ्यातून लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.   

मध्यरात्री लसींचा साठा येण्याची शक्यता...महापालिकेला प्रत्येक आठवड्याला किमान दहा लाख लसी मिळणे अपेक्षित आहे. मात्र जेमतेम दोन - तीन लाख लसींचा साठा मिळत असल्याने प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा उपलब्ध झाल्यास गुरुवारी सकाळी लससाठा वितरण करण्यात येईल. त्यामुळे पालिका व शासकीय केंद्रावर लसीकरण विलंबाने होण्याची शक्यता आहे. २५ एप्रिलपर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. यापैकी २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. ४७ हजार ७४० इतका लससाठा बुधवारी शिल्लक होता. यापैकी काही डोस वापरण्यात आले आहेत. दुसरा डोस घेण्यास पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबईसरकारमुंबई महानगरपालिका