श्याम धुमाळ, कसाराकसाऱ्यापासून १२ किमी अंतरावरील अशोका धबधब्यासह कसारा घाटात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये महिला पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रूम नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते.निसर्गाचे वरदान ठरलेल्या विहिगाव येथील अशोका धबधब्यासह कसारा घाटात मुंबई, ठाणे, नाशिक आदी भागांतून शनिवार, रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. शेकडो पर्यटकांमध्ये ३० टक्के महिला पर्यटक असतात. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर फेसाळणाऱ्या धबधब्याखाली न्हाऊन निघाल्यानंतर कपडे बदलण्याकरिता महिलांसाठी चेंजिंग रूम नसल्याने त्यांची कुचंबणा होते. या धबधब्याकडे जाण्यापूर्वी प्रवेश फी घेणाऱ्या वन विभाग - विहिगाव व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची ताडपत्रीची चेंजिंग रूम तयार करणे आवश्यक आहे. या ठिकाणी तरुणांचे ग्रुप पावसाळी पिकनिक करायला येतात. खुलेआम मद्यपान करतात. ही टारगट पोरं महिला, मुलींची खिल्ली उडवतात. अशा वेळी या हुल्लडबाजांना आवरायला तेथे कुणीही नसते, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशोका धबधबा असलेल्या विहिगावास पर्यटनस्थळाचा दर्जा देणे तसेच महिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात चेंजिंग रूम तयार करण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वी केली होती. मात्र, ती हवेतच विरल्याने पर्यटकांत नाराजी आहे.
चेंजिंग रूम नसल्याने महिला पर्यटकांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 2:29 AM