समन्वयाअभावी रखडले संरक्षक भिंतीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 02:09 AM2018-08-05T02:09:45+5:302018-08-05T02:09:53+5:30
जोगेश्वरी पश्चिमेकडील महापालिकेच्या के/पश्चिम विभागामध्ये २३ ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.
मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडील महापालिकेच्या के/पश्चिम विभागामध्ये २३ ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठान संस्थेने २८ मार्च रोजी पत्रव्यवहार करून संरक्षक भिंतीचे काम त्वरित करावे, यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु अद्यापही भिंतींच्या कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
जनजागृती मानवकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनावणे याबाबत म्हणाले की, के/ पश्चिम विभागातील बांदिवली हिल, यादवनगर, बेहराम बाग, श्यामनगर, कॅप्टन सावंत मार्ग, विकास नगर इत्यादी ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रलंबित आहे. गेल्या वर्षापासून संरक्षक भिंतींविषयी संबंधित विभागाकडे पाठपुरावा
सुरू आहे.
महानगरपालिका, म्हाडा, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी सतत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच म्हाडाकडून संरक्षक भिंत बांधण्याकरिता निधी मंजूर करून घेतलेला आहे. तरीसुद्धा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
महापालिकेच्या के/पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्ही म्हाडाला ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. तर म्हाडाच्या एका अधिकाºयाने सांगितले, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर येथे पाहणी करण्यात आली होती. टेंडरिंगचे काम जवळपास संपले आहे. सातत्याने त्या ठिकाणी भेट दिली जाते.
लवकरच संरक्षक भिंतीच्या
कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
>पावसामुळे येथे कधीही अपघात होऊ शकतो
यादवनगर परिसरातील सहा ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यादवनगर हा भाग डोंगरावर आहे. तसेच परिसरात लहान मुले येथे खेळत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत गरजेची आहे. टेकडी परिसरात राहणाºया लोकांची अवस्था दयनीय असून पावसामुळे कधीही अपघात घडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतींची दुरवस्था झाल्याने रहिवाशांच्या घरावर पडून अपघात होऊ शकतो. पावसाळ्याआधी भिंतीचे काम केले जाईल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप हवेतच आहे.
- हरीश यदुवंशी, स्थानिक रहिवासी.