डॉक्टरांअभावी रुग्ण वा-यावर
By admin | Published: July 19, 2014 12:46 AM2014-07-19T00:46:09+5:302014-07-19T00:46:09+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांअभावी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांअभावी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. ९० पदांना राज्य शासनाची मंजुरी न मिळाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून होत असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने शुक्रवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरून प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत एक प्रकारे या रुग्णालयांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर तर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयासह केडीएमसीचे ४ छोटे दवाखाने आणि १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी कल्याण-डोंबिवलीसह कर्जत-कसाऱ्यापासून ते अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड येथील लाखो नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. परंतु, आजघडीला तज्ज्ञ डॉक्टरांअभावी ही रुग्णालये शोभेचे बाहुले ठरली आहेत. रुग्णालयीन सेवेसाठी आवश्यक असलेल्या ९० पदांसंदर्भात राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. पण, ७ वर्षे उलटली तरी या पदांना मंजुरी मिळाली नसल्याकडे उपमहापौर राहुल दामले यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, शास्त्रीनगर रुग्णालयाचा आढावा घेता अपघात विभागात सर्जन नाही. नाक-कान-घसातज्ज्ञ नाही. सोनोग्राफी आणि एक्स रे मशिन आहेत, पण त्या चालवण्यास तज्ज्ञ नाही. बर्न वॉर्ड बंद असून डायलेसिस कक्ष सुरू करण्यास आमदार निधी मंजूर असूनही कार्यवाही शून्य आहे. बाह्यरुग्ण विभागाला दरवाजे नाहीत, अशी दयनीय अवस्था आहे. रुग्णालयात डॉक्टरांची वानवा असल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात किंवा मुंबई-ठाण्यातील सरकारी रुग्णालयांत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचीही अवस्था जैसे थे असून शुक्रवारी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे आणि गटनेते सचिन पोटे यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी प्रशासनाबरोबरच सत्ताधारी शिवसेना-भाजपाला विदारक परिस्थितीबाबत जबाबदार धरले आहे.
सत्ताधारी राज्य शासनाला दोष देत असले तरी महापालिका ही स्वायत्त संस्था असून प्राथमिक सुविधा पुरवणे त्यांचे कर्तव्य असल्याचे राणे म्हणाले. महापालिकेत १५ वर्षे शिवसेना-भाजपाची सत्ता असून सामान्य नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करू शकत नसल्याने ते निष्क्रिय ठरल्याचा आरोप पोटे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)