मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन थकविल्याने त्यांनी सरकारच्या निषेधार्थ फळविक्रेते होण्याचे ठरविले आहे. राज्यातील विविध शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांमध्ये याचे पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर फळविक्रेते होऊन थकीत विद्यावेतन प्राधान्याने मंजूर करण्याची मागणी करत सरकारचा निषेध केला.एरव्ही गळ्यात स्टेथोस्कोप लावून रुग्णांना तपासणाऱ्या हातात मंगळवारी वजनकाटा आणि फळे दिसल्याने, या निवासी डॉक्टरांनीये-जा करणाºयांचे लक्ष वेधले.या आंदोलनात जवळपास १५० निवासी डॉक्टर सहभागी झालेहोते. नागपूर, बीड, औरंगाबादआणि लातूरच्या निवासी डॉक्टरांना गेल्या काही महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी फळविक्री आंदोलन सुरू केलेआहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी फळांची विक्री केली.याविषयी सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी सांगितले की, राज्यात सुमारे हजार निवासी डॉक्टरांना विद्यावेतन मिळालेले नाही. या डॉक्टरांवर कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे, तरीही डॉक्टरांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे.सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास येत्या काही दिवसांत आम्ही सर्व रस्त्यावर उतरू. याचा परिणाम रुग्णसेवेवर होईल. येत्या गुरुवारी,२७ डिसेंबरला डॉक्टरांची पुन्हा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक आहे. या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.डॉ. हरी गायकवाड यांनी सांगितले की, विद्यावेतन न मिळणे ही गंभीर समस्या आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष द्यावे. फळविक्रीच्या माध्यमातून ५०० रुपये जमा झालेत. आता रस्त्यावर येण्याची वेळ आली, तरीही सरकार लक्ष देत नाही.
विद्यावेतन मिळत नसल्याने सायन रुग्णालयात निवासी डॉक्टर बनले फळविक्रेते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:26 AM