मुंबई : रेल्वे प्रवास करताना छेडछाड, अत्याचार, दुर्घटना अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला डब्यांत ‘टॉकबॅक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. मात्र, अनेक महिलांना याबाबत माहितीच नसल्याने महिलांचे याकडे दुर्लक्ष होत असून ही यंत्रणा केवळ नावापुरतीच उरल्याची खंत महिला प्रवाशांनी व्यक्त केली.पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला डब्यांत सुरक्षेसाठी आणि आपत्कालीन वेळी गार्डशी संपर्क साधता यावा, यासाठी ‘टॉकबॅक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी महिला दिनाच्या दिवशी लावण्यात आलेल्या या यंत्रणेबाबत अनेक महिला प्रवाशांना माहितीदेखील नाही. त्यामुळे या यंत्रणेचा वापर महिलांकडून होत नाही.महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी सांगितले की, गाडीतून एखादी महिला पडल्यावर किंवा आपत्कालीन वेळी या यंत्रणेचा वापर होऊ शकतो. मात्र पश्चिम रेल्वेद्वारे कोणतीही जनजागृती केली नसल्याने या यंत्रणेचा वापर होत नाही. पश्चिम रेल्वेने या यंत्रणेची माहिती सर्व महिला प्रवाशांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. तेव्हाच या यंत्रणेचा वापर होईल.प्रवासी गीता गायकवाड यांनी सांगितले की, टॉकबॅकद्वारे गार्डशी संपर्क साधून आपत्कालीन वेळी या यंत्रणेचा वापर होऊ शकतो. मात्र त्यासाठी ती कोणत्या लोकलमध्ये बसविली आहे, याची माहिती पश्चिम रेल्वेने द्यायाला हवी. ती सर्व उपनगरीय लोकलमध्ये लावल्यास महिला प्रवाशांसाठी उपयोगी ठरेल.जनजागृतीसाठी ट्विटरचा वापरपश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी महिला दिनी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये टॉकबॅक यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे महिला प्रवासी संकटाच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या यंत्रणेचा वापर करता येईल. या यंत्रणेची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटद्वारे पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. यामुळे महिला प्रवाशांमध्ये जागृती निर्माण करता येईल.
माहितीच्या अभावामुळे टॉकबॅकच्या वापराकडे महिला प्रवाशांचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 5:31 AM