मुंबई : दिवाळीनिमित्त जाहीर झालेला सानुग्रह अनुदान बेस्ट उपक्रमाच्या कर्मचा-यांना अद्याप मिळालेला नाही. ही रक्कम कधी देणार याची तारीखही अनिश्चित आहे. पैशांची सोय होईपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात प्रशासनाने बेस्ट समितीच्या बैठकीत असमर्थता दाखविली. यामुळे संतप्त काँग्रेस, राष्ट्रवादीसह पहारेक-यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपानेही सभात्याग केला. त्यामुळे बेस्ट कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा वाद चिघळला आहे.बेस्ट कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान नाही मिळाल्यास एेन दिवाळीत आंदोलन पुकारण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला होता. यामुळे बेस्ट प्रशासनाने कामगारांना साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र आर्थिक संकटात असल्याने ही रक्कम अद्याप बेस्ट प्रशासनाने कर्मचा-यांना दिलेली नाही. याबाबत बेस्ट समिती सदस्यांनी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना आज जाब विचारला.मात्र कुठलेही सोंग आणता येऊ शकते, पण पैशाचे नाही. पैसे कुठून आणणार याबाबत पुढील आठवड्यात समिती सदस्यांना माहिती देण्यात येईल. परंतु सानुग्रह अनुदान कधी देणार याची तारीख जाहीर करणे शक्य नाही, अशी ठाम भूमिका महाव्यवस्थापकांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत प्रशासन कर्मचा-यांच्या तोंडाला पानं पुसणार असा संशय व्यक्त करीत विरोधक व भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.अर्थसंकल्पावरील चर्चा रखडलीबेस्ट समितीच्या बैठकीत सन २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. मात्र सानुग्रह अनुदानप्रकरणी सभात्याग केल्यामुळे अर्थसंकल्पावर सुचना मांडण्यासाठी विरोधक बैठकीत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी अडचण झाली. अखेर सभा तहकूब करीत गुरुवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पालिका आयुक्तांकडे मदतीचे साकडेबेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या शिफारशींनुसार कृती आराखडा बनविण्यात आला. त्यानुसार अनेक प्रवासी सवलती व कर्मचा-यांच्या भत्त्यात कपात करण्यात आली. मात्र बेस्ट उपक्रम अद्याप तोट्यातचं असून सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात 720 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामुळे कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.