सीबीडीतील भाजी मंडईची नियोजनाअभावी दुरवस्था
By admin | Published: July 12, 2015 12:55 AM2015-07-12T00:55:10+5:302015-07-12T00:55:10+5:30
सेक्टर एक परिसरातील श्री छत्रपती शाहू महाराज भाजी मंडईत गेल्या कित्येक दिवसांपासून सुविधांची वानवा आहे. अस्वच्छतेमुळे विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही अनेक
नवी मुंबई : सेक्टर एक परिसरातील श्री छत्रपती शाहू महाराज भाजी मंडईत गेल्या कित्येक दिवसांपासून सुविधांची वानवा आहे. अस्वच्छतेमुळे विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. येथे साठलेल्या कचऱ्यामुळे माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्याबरोबरच विविध आजारांनाही आमंत्रण मिळत आहे.
या परिसरातील कचरा वेळोवेळी न उचलल्याने इथल्या दुर्गंधी आणि घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आजूबाजूला असलेला दुर्गंधीयुक्त कचरा, मागील बाजूस असलेल्या मासळी बाजारातील कचऱ्यावर घोंगावणा-या माशा अशा घाणीच्या साम्राज्यातच येथे भाज्यांची विक्री केली जाते. स्वच्छतेबाबत पालिकेकडून नियमित अश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही. या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांशी चर्चा केल्यावर असे निदर्शनास आले की सकाळी सात वाजल्याच्या सुमारास एकदा कचरा उचलल्यानंतर दिवसभर या विक्रेत्यांना घाणीतच बसावे लागते. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुुळे ग्राहकही या ठिकाणी येण्यासाठी टाळाटाळ करतात.
त्यामुळे विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, अशी तक्रार या विक्रेत्यांनी केली.
पालिकेकडून निवारा शेडची व्यवस्था नसल्याने ताडपत्री टाकून विक्रेत्यांना स्वत:चे पावसापासून संरक्षण करावे लागते. या मंडईच्या मागील बाजूस असलेल्या झोपडपट्टीमधील कचराही अनेकदा उघड्यावरच टाकण्यात येतो. स्वच्छतागृहामध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे शौचालयाचा वापरही करता येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, अशी तक्रार विक्रेत्या महिलांकडून करण्यात आली. रखडलेल्या गाळा वाटपाच्या प्रश्नाने इतर ठिकाणच्या भाजी मंडईचा मुहूर्त लागत नाही आणि आहे त्या मंडईकडे लक्ष दिले जात नसल्याने विक्रते आणि ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या मंडईत परिसरातून जातानाही दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले पाहिजे. कचराकुंड्यांची संख्या वाढविली तर उघड्यावरील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- सिंधू नायर, ग्राहक
पालिकेच्या वतीने या ठिकाणी असलेल्या कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावली जाते. आजतागायत यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही.
- मनोहर गांगुर्डे, विभागीय अधिकारी, बेलापूर