मुंबई : इमारतींमध्ये सततची गळती, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, दूषित पाणीपुरवठा, शौचालयाचे पाणी पिण्याच्या टाकीत जात असल्यामुळे विद्याविहारमधील ४०० कुटुबांचे हाल सुरू आहेत. मात्र, महापालिकेच्या दोन विभागांनी हद्दीवरून या रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी टोलवाटोलवी सुरू केली आहे. या सीमावाद रहिवाशांचा प्रश्न अनुत्तरीत असून गैरसोयींमुळे त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
एन विभागातील विद्याविहार पूर्व तानसा जलवाहिनीवरील प्रकल्पबाधितांना एल विभागातील प्रिमीअर कंपनीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने बांधलेल्या इमारतींमध्ये ४०० घरे मिळाली आहेत. मात्र या घरांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे.
याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी पालिकेचे अधिकारी आणि प्रकल्पबाधित रहिवाशांची संयुक्त बैठक घेतली होती. या वेळी सहायक आयुक्त पराग मसूरकर यांच्यासह एन आणि एल या संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत गटार दुरुस्ती, पिण्याचे पाणी, धुम्र फवारणी, साफसफाई, पाण्याची गळती, कचरा उचलणे यासाठी तातडीने उपायायोजना करण्याचे आदेश सहायक आयुक्तांनी एल विभागाच्या अधिकाºयांना दिले. नागरी सुविधा देण्यासाठी निधी कमी पडत असल्यास नगरसेवक निधी पुरविण्यात येईल, असे लांडे यांनी स्पष्ट केले. संबंधित ७२ रहिवाशांना तातडीने ताबा पत्र देण्याचे आदेशही त्यांनी दिले.