मुंबई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना परिणामकारकपणे राबविता यावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सहकार विभागामार्फत करण्यात येते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची आहे, परंतु राज्यातील ३१ पैकी सुमारे २२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व २१ हजार २२५ विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी ८ हजार १९४ सोसायट्यांच्या निवडणुका जानेवारी ते जून या कालावधीत प्रस्तावित आहेत. निवडणुकांमुळे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत अडचण निर्माण होऊ नये, म्हणून त्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या प्रकरणी उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत आणि ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे, तिथे निवडणूक होणार आहे.शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज मिळावे म्हणून...कर्जमुक्ती योजनेसाठी पोर्टलवर माहिती अपलोड करणे, शेतकऱ्यांची यादी बँकांना उपलब्ध करून देणे, शेतकºयांच्या याद्यांची प्रसिद्धी, कर्ज खातेदारांचे प्रमाणीकरण, या कामात सहकार विभागातील कर्मचारी व्यग्र आहेत. खरिपासाठी शेतकºयांना कृषिकर्ज मिळावे, यासाठी हे काम वेळेत करणे आवश्यक असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बँकांसह सोसायट्यांच्या निवडणुका लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:15 AM