- संकेत सातोपेमुंबई : ब्रिटिशकालीन व्यापारी बेट ते आंतरराष्टÑीय दर्जाचे महानगर अशा मुंबईच्या विकासाचे साक्षीदार असणारे येथील गडकोट सध्या राज्यातील अन्य गड-किल्ल्यांप्रमाणेच दुरवस्थेत आहेत. धारावी, माहीम येथील किल्ल्यांना अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. त्याच वेळी स्थानिक कोळी बांधवांच्या पुढाकारामुळे वरळीचा किल्ला मात्र अद्यापही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते. व्यायामासाठी परिसरातील तरुणांना किल्ल्यात एकत्र करून बल आणि दुर्गसंवर्धन साधल्याचे ‘डॅनी’ या स्थानिक मासेमार तरुणाने सांगितले.वरळी किल्ल्याच्या तटबंदीवरून समोरच दिसणाऱ्या माहीमच्या किल्ल्यात परप्रांतियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. किल्ल्याच्या द्वारापासूनच दोन-तीन मजली बांधकाम करण्यात आल्यामुळे अभ्यासक आणि दुर्गप्रेमींनी आत प्रवेशही करता येत नाही. याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे येथील एका स्थानिक महिलेने सांगितले. किल्ल्यात घुसखोरी करून राहिलेल्यांच्या दंडेलीमुळे किल्ल्याबाहेर राहणाºया ख्रिस्ती, कोळी या मूळ रहिवाशांना मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे.या उदाहरणावरून बोध घेत, स्थानिक तरुणांना एकत्र करून वरळीतील किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याचे डॅनी याने सांगितले. सध्या या किल्ल्यात दुर्गंधी, अस्वच्छता सोडा; साधा कागदाचा कपटाही सापडत नाही. काळ्याभोर ताशीव दगडातल्या प्रवेशद्वारातून आत शिरताच समोर एक हनुमंताचे मंदिर आणि त्याशेजारी लहानशी शेड करून व्यायामाचे साहित्य ठेवलेले दिसते. त्यामुळे कोळीवाड्यातील तरुणांचा येथे नियमित वावर असतो. परिणामत: येथे मासे सुकविण्यासाठी किंवा जुगार, नशा करण्यासाठी येणाºयांचे प्रमाण आपोआपच कमी झाले. येथील अस्वच्छतेला आणि गैरप्रकारांना आळा बसला, असे डॅनी म्हणतो.
स्थानिकांच्या पुढाकारामुळे वरळी किल्ल्याचे संवर्धन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:40 AM