Join us

लोकलमुळे महिला उद्योगांना भरारी, प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:13 AM

सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत लोकल सेवा सुरू झाली. सकाळी ११ वाजता आमच्या प्रतिनिधीनेही बदलापूर ते सीएसएमटी प्रवास सुरू केला.

मुंबई : लोकल प्रवासामुळे महिलांच्या लघुउद्योगांना पुन्हा उभारी मिळत असल्याचे पाहावयास मिळते आहे. तर काही जणी पतीच्या कामाचा भार उचलण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. मात्र मधल्या वेळेत करायचे काय, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याने लोकल सेवा पूर्ण वेळ सुरू करण्याची मागणी त्यांच्याकड़ून होत आहे.

सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत लोकल सेवा सुरू झाली. सकाळी ११ वाजता आमच्या प्रतिनिधीनेही बदलापूर ते सीएसएमटी प्रवास सुरू केला. तिकीट खिडकी ते फलाटावर लोकल येईपर्यंत रेल्वे पोलिसांमुळे महिलांकड़ून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होताना दिसले. मात्र लोकल येताच, याचे तीनतेरा वाजले. त्यातही सुरुवातीला कोरोनाचे कारण देत महिलांनी चौथ्या सीटसाठी नकार दिला. मात्र  काही महिलांनी कोरोना गेला. म्हणत वाद घालून चौथ्या सीटवर स्थान मिळवले.

 बदलापूर ते ठाणेपर्यंत महिलांची गर्दी वाढताना दिसली. त्यात गर्दीतूनही काही जणी किमान तोंडावरचा मास्क तरी टिकून राहावा म्हणून धडपड करताना दिसल्या. याच गर्दीत लघुउद्योगासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची लगबग जास्त दिसून आली. कल्याण येथील रहिवासी असलेल्या मानवी चांडीस यांचा हॅन्डबॅग विक्रीचा व्यवसाय आहे. त्या दादर, भुलेश्वर मार्केटमधून सामान  खरेदी करतात. मात्र लॉकडाऊनमुळे बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यात घरातील सामानही लॉकडाऊनपूर्वी संपले. अशात सात महिन्यांनी त्या सामान खरेदीसाठी बाहेर पडल्याने तितकाच आधार मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे पतीला लोकलमध्ये प्रवेश नसल्याने बदलापूरच्या रोहिणी शर्मा या पतीच्या उद्योगासाठी लागणारे सामान घेण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. अशा अनेक जणी छोट्यामोठ्या खरेदीसाठी बाहेर पडल्या. यातही पूर्वी बसने प्रवास करून कामासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई गाठणाऱ्या नोकरदार महिलांनीही सुटकेचा निःश्वास टाकलेला पाहावयास मिळाला. 

 

 अत्यावश्यक सेवेतील महिलांची कोंडी..सर्व महिलांसाठी प्रवास सुरू झाल्याने अत्यावश्यक सेवेतील महिलांची यात कोंडी होताना दिसली. ठाणे येथे एका खासगी रुग्णालयात काम करीत असलेल्या पल्लवी राणे हिने दिलेल्या माहितीनुसार, आधी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असल्याने लोकल रिकामी असायची. या वेळेत झोपून प्रवास करीत होतो. आता मात्र उभे राहायलाही जागा मिळत नसल्याचे तिने सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालोकलमुंबईमहिला