कमी हिमोग्लोबिनमुळे महिलांचे रक्तदान घटले
By Admin | Published: October 1, 2015 02:16 AM2015-10-01T02:16:39+5:302015-10-01T02:16:39+5:30
जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्का वाढत असला तरीही महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या असलेल्या कमतरतेमुळे त्या रक्तदानापासून वंचित राहत आहेत
मुंबई : जनजागृतीमुळे रक्तदानाचा टक्का वाढत असला तरीही महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या असलेल्या कमतरतेमुळे त्या रक्तदानापासून वंचित राहत आहेत. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२च्या खाली असल्यास महिला रक्तदान करू शकत नाहीत. एका पाहणीनुसार सध्याच्या घडीला देशात हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या महिलांचे प्रमाण तब्बल ७० टक्के इतके आहे.
महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असण्यामागे संस्कृती आणि संस्कारांचा भाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशभरातील शिक्षित अथवा अशिक्षित महिला असली तरीही ती कुटुंबाचा विचार आधी आणि नंतर स्वत:चा विचार करते. यामुळे अनेकदा लहानपणी मुलींना मिळणारा आहार हा तुलनेने सकस नसतो. त्यामुळे महिला अॅनिमिक होत जातात. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ते १४ असणे आवश्यक आहे. पण अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिन ९ ते १० असते. १० पेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना अॅनिमिक म्हटले जाते, असे कपूर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले.
हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे महिलांना इच्छा असूनही अनेकदा रक्तदान करता येत नाही. रक्तदान करायला गेलेल्या महिलांना अनेकदा रक्तदान न करता निराश होऊन परतावे लागते. १८ वयापर्यंत मुलींचे हिमोग्लोबिन १२ पर्यंत असलेच पाहिजे. पण अनेकदा या वयातही मुलींचे हिमोग्लोबिन १२ च्या खाली असते. यामुळे लहानपणी जंत झाल्यास औषध देणे, मासिक पाळी आल्यावर जास्त रक्तस्राव झाल्यास डॉक्टरचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. रक्तदान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. महिलांचा सहभाग रक्तदानात असावा, यासाठी त्यांनी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय केले पाहिजेत, असेही डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
---------
मुंबईत दरवर्षी अंदाजे तीन लाख युनिट रक्त तसेच रक्त घटकांची गरज भासते. रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मुंबईतील ५७ शासनमान्य रक्तपेढ्यांमध्ये ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढवण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
मुंबईत होणाऱ्या जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानात वाढ होताना दिसत आहे. २०१४ मध्ये २ हजार ५३४ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यामधून २ लाख ७८ हजार ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. २००२ मध्ये ऐच्छिक रक्तदात्यांचा टक्का ५६.३ इतका होता.
२०१४ मध्ये हे प्रमाण ९३.७ टक्के इतके वाढले आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत १ हजार ६८४ रक्तदान शिबिरांमधून १ लाख ८८ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. २०१४-१५ मध्ये ९८ महाविद्यालयांतील ११६ शिबिरांमधून १३ हजार तरुणांनी रक्तदान केले आहे.