लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या काही परिसरात पावसाची नोंद झाली आहे. सकाळी दाखल झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुपारपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरूपात कोसळत होत्या. तर किंचित काही ठिकाणी पडलेले तुरळक ऊन वगळता उर्वरित मुंबई गुरुवारप्रमाणे ढगाळच होती. शनिवारीदेखील मुंबईत सर्वसाधारणपणे असेच वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईकरांची सकाळच पावसाने उजाडली. मुंबईत सर्वदूर ठिकठिकाणी पावसाची नोंद होत होती. रिमझिम सुरू असलेला हा पाऊस मुंबई आणि नवी मुंबईत हजेरी लावत होता. दक्षिण मुंबईसह मुंबईच्या उपनगरात दूरवर सरीवर सरी कोसळत होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी असेच वातावरण होते. दुपारीदेखील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी नोंदविण्यात आल्या. दुपारी काही काळ किंचित ऊन पडले. मात्र पुन्हा संपूर्ण दुपार ढगाळ वातावरणाने भरून गेली होती. दिवसभर मुंबईवर ढगाळ वातावरण असल्याने जणू काही सकाळी आणि दुपारीच मुंबईत सायंकाळ झाली आहे, असे भासत होते. सायंकाळी सूर्यास्तालादेखील मुंबई ढगाळ हवामानाने व्यापून गेली होती.
-------------------
अंदाज
१२ आणि १३ डिसेंबर : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
१४ आणि १५ डिसेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
१२ आणि १३ डिसेंबर : मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
-------------------
पुणे आणि मुंबई २८ अंशांवर
शुक्रवारी पडलेल्या पावसाने मुंबईच्या सकाळच्या वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला होता. तर शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान २८.८ तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी मुंबई आणि पुण्याचे कमाल तापमान एकसारखे म्हणजे २८.८ एवढे नोंदविण्यात आले आहे.
-------------------
तापमान घसरले
मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या ३ दिवसांच्या तुलनेत ७ अंशांनी घसरण झाली आहे. ढगाळ हवामानादरम्यान तापमानात झालेली वाढ आणि पावसानंतर हवामानात झालेल्या बदलांनंतर तापमानात घसरण झाली आहे.
-------------------
मुंबईचे कमाल तापमान
९ डिसेंबर - ३६
१० डिसेंबर - ३३.४
११ डिसेंबर - २८.८
-------------------