बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्याला ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:00 AM2018-12-06T06:00:44+5:302018-12-06T06:00:52+5:30

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

Due to the low pressure area in the Bay of Bengal, | बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्याला ताप

बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्याला ताप

Next

मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. वातावरणातील या बदलाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील शहरांच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. गुलाबी थंडी गायब झाली असून राज्यात पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्याचे तापमान वाढणार असल्याने उकाडाही वाढणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे १४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
६ डिसेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.
७, ८ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, विदर्भात हवामान कोरडे राहील.
९ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
६ आणि ७ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २० अंशाच्या आसपास राहील.
>...तोपर्यंत किमान तापमानात घट नाहीच
पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे आणि मुंबईच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ; हे प्रमुख घटक रात्रीसह दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास कारणीभूत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत नाहीत तोपर्यंत किमान तापमानात अधिकची घट नोंदविली जाणार नाही.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

Web Title: Due to the low pressure area in the Bay of Bengal,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.