कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 05:47 PM2020-10-07T17:47:19+5:302020-10-07T17:47:46+5:30
Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
मुंबई : परतीचा मान्सून ८ आक्टोबर रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र हवामानातील बदलामुळे परतीचा मान्सून अद्यापही उत्तर भारतात असतानाच आता दुसरीकडे ९ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल. आणि ही स्थिती पुढचे ६, ७ दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. ८ आणि ९ आक्टोबर रोजी मुंबई ढगाळ राहील. तापमान ३३ अंशाच्या आसपास राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून ८ ऑक्टोबर रोजी मुंबईतून आणि ११ ऑक्टोबर रोजी पुण्यातून माघार घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही शहरांतून मान्सूनच्या परतीचा प्रवास यापेक्षाही विलंबाने सुर होईल, असा अंदाज आहे. तर नागपूरमधून मान्सून ६ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरु करेल, असा अंदाज आहे. मात्र येथेही मान्सून चकवा देणार असून, परतीच्या पावसाला आणखी लेटमार्क होईल. राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून अद्याप तरी महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. ऑक्टोबरच्या तिस-या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर परतीचा मान्सूनचा प्रवास मुंबईतून देखील सुरु होईल.