लोअर परळ पूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला; समन्वयाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:20 AM2019-01-28T01:20:19+5:302019-01-28T01:20:42+5:30

दक्षिण मुंबईतील हाजीअली, पेडर रोड, वॉर्डन रोड या उच्चभ्रू वस्त्यांतील रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे.

Due to lower Parel Bridge closure, transportation speed slowed down; Coordination blow | लोअर परळ पूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला; समन्वयाचा फटका

लोअर परळ पूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला; समन्वयाचा फटका

googlenewsNext

मुंबई : दक्षिण मुंबईतील हाजीअली, पेडर रोड, वॉर्डन रोड या उच्चभ्रू वस्त्यांतील रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासन वेगवेगळे प्रयोग करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. एल्फिन्स्टन जंक्शनवरही दुतर्फा असणारे अनधिकृत पार्किंग, लोअर परळचा बंद असलेला पूल यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. एल्फिन्स्टन जंक्शन येथील वाहतुकीमळे रुग्णालयीन मार्गांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही जंक्शनवर वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिका व वाहतूक विभागाने कृतिशील आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

महापालिकेच्या डी विभागातील काही रस्ते व्हीव्हीआयपी रस्ते म्हणून ओळखले जातात. डी विभागातील पेडर रोड अर्थात डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, केम्स कॉर्नर येथील सीताराम पाटकर मार्ग, बाबुलनाथ रोड, आॅगस्ट क्रांती मार्ग आणि वाळकेश्वर रोड आदी रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हाजीअली ते पेडर रोड मार्गावर होणाऱ्या पुलावरून वादंग उठला होता. या वादानंतर या पुलाची उभारणी केवळ कागदावरच राहिली. सध्या या रस्त्यांवर सकाळी कार्यालयीन वेळेत ते सायंकाळी ७ ते १० दरम्यान वाहनांची गर्दी दिसते. यापूर्वी परिसराचे सर्वेक्षण करून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात आली होती. मात्र आता दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करता या ठिकाणी दिशादर्शक फलक, स्थळदर्शक फलक, इशारा फलक, रस्ते दुभाजक, लेन मार्किंग केले पाहिजे. याविषयी स्थानिक राजेंद्र राणावत यांनी सांगितले की, या परिसरात होऊ घातलेल्या हाजीअली ते पेडर रोड पुलामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असता. मात्र उच्चभ्रू वस्त्यांमधील लोकांच्या खासगी आयुष्यास अडथळा निर्माण होईल या कारणाने हे काम कायमचे ठप्प झाले. मात्र या मार्गांवरील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे रस्त्याच्या बाजूला होणाºया पार्किंगवर कडक कारवाई झाली पाहिजे.
एल्फिन्स्टन जंक्शन येथील वाहतुकीमुळे केईएम, जेरबाई वाडिया, टाटा ही रुग्णालये असलेल्या मार्गावर कोंडी निर्माण होते.

वाहतूककोंडीचा फटका महिला, ज्येष्ठ नागरिकांना अधिक बसतो. लोअर परळचा पूल बंद असल्यामुळे येथील वाहतुकीवर भार अधिक वाढला आहे. प्रभादेवी येथील धनमिल नाका प्रभादेवी स्थानकाचे अंतर केवळ दोनशे मीटर आहे, मात्र ते अंतर पार करण्यासाठी वाहतूककोंडीमुळे जवळपास ४०-४५ मिनिटांचा अवधी लागतो. त्याचप्रमाणे या मार्गावरून टाटा, वाडिया, केईएम रुग्णालयांत जाणाºया रुग्णांचे हाल होतात. रुग्णवाहिका अडकल्याचे दिसून येते. मात्र लोअर परळ पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत येथील परिस्थिती बदलणार नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु, दिवसागणिक वाढणाºया कोंडीमुळे परिसरातील प्रदूषणही वाढले आहे. टॅक्सी केल्यास जवळपास ८० रुपयांचा भुर्दंड पडतो आणि उचित वेळी पोहोचता येत नसल्याचा मनस्तापही सहन करावा लागतो, असे स्थानिक मंगलराज येवले यांनी सांगितले.

Web Title: Due to lower Parel Bridge closure, transportation speed slowed down; Coordination blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.